मुष्टियुद्धमध्ये सचिन, लवलिना, जादुमनी सिंग विजयी, जलतरणमध्ये भारताची निराशा
वृत्तसंस्था, ग्लास्गो
येथे सुरू झालेल्या 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या झंडूकुमारने पुरूषांच्या हेवीवेट पॉवरलिफ्टिंग प्रकारात पहिले कांस्यपदक पटकाविले.
झंडूकुमारच्या या कामगिरीमुळे भारताचे या स्पर्धेतील पदक तक्त्यात खाते उघडले गेले. मुष्टियुद्ध या क्रीडा प्रकारात भारताच्या लवलिना बोर्गोहेनने आपले पदक निश्चित केले आहे. तर सचिन सिवाच व जादुमनी यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. जलतरण प्रकारात भारताच्या शशीकुमार आणि नेहरा यांच्याकडून निराशा झाली. तसेच पॅरा जलतरणमध्ये भारताच्या कार्तिक बुडिगीनाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. ऑस्ट्रेलियाने पुरुषांच्या फ्रिस्टाईल रिले प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेच्या पदकतक्त्यात ऑस्ट्रेलियाने 6 सुवर्ण, 2 रौप्य, 5 कांस्य अशी एकूण 13 पदकांसह आघाडीचे स्थान दुसऱ्या दिवसाअखेर मिळविले आहे. या तक्त्यामध्ये भारत 1 कांस्यपदकांसह संयुक्त नवव्या स्थानावर आहे.
पुरुषांच्या पॉवरलिफ्टिंग प्रकारातील हेविवेट गटात भारताच्या झंडूकुमारने 130.9 गुणांसह कांस्यपदक पटकाविले. त्याने 181 आणि 190 किलो वजन आरामात उचलले. पण 196 किलो वजन उचलण्यात तो अपयशी ठरला. या क्रीडा प्रकारात नायजेरियाच्या इद्रीस रिलुवानने 132.8 गुणांसह सुवर्ण तर स्कॉटलंडच्या मॅथ्यु हार्डिंगने 131 गुणांसह रौप्यपदक मिळविले.
सचिन उपउपांत्यपूर्व फेरीत
मुष्टियुद्ध या क्रीडा प्रकारात भारताच्या लवलिना बोर्गोहेनने महिलांच्या 75 किलो वजन गटात थेट प्रवेश केला असून आता तिचे लक्ष सुवर्णपदकावर आहे. 28 वर्षीय बोर्गोहेनचा उपांत्य फेरीचा सामना शुक्रवार 31 जुलै रोजी तेफाकीबरोबर होणार आहे. बोर्गोहेनने यापूर्वी ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक तर विश्व मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक तसेच आशियाई स्पर्धेतही आपले वर्चस्व राखले होते.
पुरूषांच्या विभागात भारताच्या सचिन सिवाचने 60 किलो वजन गटातील लढतीत कॅनडाच्या केओमा अल अहमदेचा 4-1 अशा गुणांनी पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे. आता सचिनचा पुढील सामना इंग्लंडच्या हेविटबरोबर होणार आहे.
पुरुषांच्या 55 किलो वजन गटात भारताच्या जादुमनी सिंगने उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे. 22 वर्षीय जादुमनी सिंगने स्कॉटलंडच्या अॅरॉन क्युलेनचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला आहे. जादुमनी सिंगचा पुढील फेरीतील सामना पाकच्या रेहमानबरोबर होणार आहे.
जलतरणमध्ये निराशा
जलतरण या क्रीडा प्रकारात भारताच्या दक्षण शशीकुमार आणि आर्यन नेहरा यांच्याकडून साफ निराशा झाली. भारताच्या या दोन्ही जलतरणपटूंना 400 मी. फ्रिस्टाईल जलतरण प्रकारात अंतिम फेरीसाठी आपली पात्रता सिद्ध करता आली नाही. शशिकुमारला पंधराव्या तर नेहराला सोळाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याचप्रमाणे पॅरा जलतरण प्रकारात भारताचा जलतरणपटू कार्तिक बुडिगीनाने पुरूषांच्या 100 मी. फ्रिस्टाईल एस-13 विभागात चौथे स्थान मिळविल्याने तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही. त्याने या क्रीडा प्रकारात 57.57 सेकंदाचा अवधी नोंदविला. द. आफ्रिकेच्या नाथन हेन्ड्रीक्सने 54.54 सेकांदाचा अवधी घेत सुवर्णपदक, स्कॉटलंडच्या क्लेगने 55.16 सेकंदांचा अवधी घेत रौप्य आणि इंग्लंडच्या मॅथ्यु रेडफर्नने 56.86 सेकांदाचा अवधी घेत कांस्यपदक पटकाविले. पुरूषांच्या 50 मी. बॅकस्ट्रोक प्रकारात भारताचा जलतरणपटू श्रीहरी नटराजने उपांत्य फेरीसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे. त्याने पात्रता फेरीमध्ये 25.52 सेकंदाचा अवधी नोंदविला.
ऑस्ट्रेलियाला सुवर्ण
पुरूषांच्या 4×100 फ्रिस्टाईल रिले जलतरण प्रकारात ऑस्टेलियाने सुवर्णपदकाला गवसणी घातली. ऑस्ट्रेलियाच्या जलतरणपटूने या क्रीडा प्रकारात नवा स्पर्धा विक्रम करताना 3 मिनिटे 09.49 सेकांदाचा अवधी नोंदविला. या क्रीडा प्रकारात ब्रिटनने रौप्यपदक तर दक्षिण आफ्रिकेने कांस्यपदक मिळविले.
पदक तक्ता
देश सु. रौ. कांस्य. एकूण
ऑस्ट्रेलिया 6 2 5 13
नायजेरिया 3 3 0 6
स्कॉटलंड 2 2 0 4
इंग्लंड 1 4 3 8
कॅनडा 1 0 2 3
द.आफ्रिका 1 0 2 3
न्यूझीलंड 0 2 0 2
वेल्स 0 1 0 1
मलेशिया 0 0 1 1
भारत 0 0 1 1

