Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कपिलेश्वर मंदिर तलावाशेजारील तीन घरे मनपाकडून सील

कपिलेश्वर मंदिर तलावाशेजारील तीन घरे मनपाकडून सील

लावाची दुसरीही भिंत कोसळली : बॅरिकेडस लावून प्रवेश बंदी

बेळगाव : कपिलेश्वर मंदिरामागील ऐतिहासिक तलावाची भिंत कोसळल्याने दोन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी पहाटे 4 च्या दरम्यान तलावाची दुसरी संरक्षक भिंतदेखील कोसळली आहे.

इतकेच नव्हे तर तेथील घरांच्या भिंतीना तडे जात असताना खबरदारी म्हणून महापालिकेकडून तीन घरे सिल करण्यात आली आहेत. संबंधित घरातील नागरिक व साहित्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे. रविवारी सकाळी कपिलेश्वर मंदिरच्या पाठीमागील बाजूला असलेल्या तलावात पोहोण्यासाठी गेलेल्या शिवम सुंडीकर आणि परशराम निलजकर या दोन बालकांचा अंगावर तलावाची संरक्षक भिंत कोसळल्याने मृत्यू झाला होता. त्यातच पुन्हा रविवारी पहाटे तलावाची दुसरी संरक्षक भिंतही कोसळली आहे. परिसरातील तीन घरांना धोका निर्माण झाला असल्याने महानगरपालिकेकडून खबरदारी म्हणून तलावाच्या चोहोबाजूंनी बॅरिकेडस लावून परिसरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

 ज्या घरांना धोका निर्माण झाला आहे. तेथील रहिवाशांशी संपर्क साधून संभाव्य धोका टाळण्यासाठी पर्यायी ठिकाणी स्थलांतरित होणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्या घरांवर नोटीस चिकटवून घरे सील करण्यात आले. तेथील रहिवासी घरातील साहित्यासह अन्यत्र ठिकाणी स्थलांतरित झाले. कपिलेश्वर तलावाचा परिसर ऐतिहासिक असून त्याठिकाणी जागृत मंदिरे आहेत. दर सोमवारसह सण उत्सवाच्या काळात भाविकांची मोठी गर्दीही होत असते. परिसरात घरेदेखील असल्याने नागरिकांची वर्दळ असते. मात्र गेल्या अनेक वर्षापासून तलावाच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे सदर तलाव धोकादायक बनला आहे. सततच्या पाण्यामुळे जुन्या बांधकामांच्या भिंती जीर्ण बनल्या आहेत. कपिलेश्वर मंदिरच्या मागील जुना तलाव धोकादायक बनल्याचे लक्षात येताच महानगरपालिका अलर्ट मोडवर आली आहे. तलावातील पाण्याचा उपसा करण्यात आला असला तरीही मोठे झरे असल्याने पाणी कमी होत नसल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले.

 कपिलेश्वर तलावाच्या सुरक्षिततेसाठी आज निवेदन

कपिलेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या तलावात संरक्षक भिंत कोसळून दोन मुलांचा बळी गेला. या तलावाची पुनर्बांधणी करून प्रशासनाने सुरक्षितता वाढवावी, या मागणीसाठी या संदर्भात महाराष्ट्र एकीकरण युवा सीमाभाग व नागरिकांच्यावतीने मंगळवार दि. 5 मे रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. तरी कपिलेश्वर मंदिर परिसरातील नागरिक व इतरांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat