Dailyhunt
कर्ले, खादरवाडी, सोनोली, वाघवडेत विठूनामाचा गजर

कर्ले, खादरवाडी, सोनोली, वाघवडेत विठूनामाचा गजर

विठ्ठल-रखुमाई मंदिरात दर्शनासाठी भक्तांची गर्दी : काकड आरती, हरिपाठ, भजन, प्रवचन, महाप्रसाद आदी कार्यक्रम

वार्ताहर/किणये

'बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल।

करावा विठ्ठल जीवभाव।

संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाप्रमाणे तालुक्याच्या पश्चिम भागातील कर्ले, वाघवडे, खादरवाडी, सोनोली गावात सोमवारी विठूनामाचा गजर झाला.

या गावांमध्ये पांडुरंग व हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त काकड आरती, भजन, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, भारुडी भजन असे कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाले. कर्ले येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात शनिवारपासून पांडुरंग सप्ताहाला सुरुवात करण्यात आली. तीन दिवस हा सप्ताह झाला. या सप्ताहाच्या माध्यमातून अध्यात्माचा जागर करण्यात आला. शनिवारी दुपारी विठ्ठल रखुमाई मंदिरात गाऱ्हाण्याचा कार्यक्रम होऊन सप्ताहाला सुरुवात करण्यात आली.

 रात्री कारलगा येथील भजनी मंडळाचा भारुडी भजनाचा कार्यक्रम झाला. रविवारी पहाटे काकड आरती करण्यात आली. दुपारी 4 वा.हरिपाठ झाला. रात्री मलतवाडी ता. गडहिंग्लज येथील भजनी मंडळाचा भारुडी भजनाचा कार्यक्रम झाला. विविध अध्यात्मिक कथा, रामायण-महाभारतातील काही प्रसंग या भारुडी भजनाच्या माध्यमातून सादर केले जातात. कर्ले गावातील भारुडी भजनाची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आहे. गावातही विठ्ठल रखुमाई भजनी मंडळाचे कार्यकर्ते भारुडी भजन करतात. या भारुडी भजनातून अध्यात्माचा जागरही करण्यात येतो.

 सोमवारी या सप्ताहाची सांगता करण्यात आली. सकाळी गावात दिंडी झाली. दुपारी 12 च्या दरम्यान ग्रामस्थांच्या उपस्थितीत गाऱ्हाणाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. पंचक्रोशतील भाविक कर्ले येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात येऊन दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेताना दिसत होते. सोनोली येथे शनिवारपासून विठ्ठल रखुमाई मंदिरात पांडुरंग सप्ताहाला सुरुवात करण्यात आली. पहाटे काकड आरती करण्यात आली. त्यानंतर महापूजा व ध्वजपूजन करण्यात आले. दुपारी गाथा भजन झाले. सायंकाळी हरिपाठ करण्यात आले. रात्री मलतवाडी येथील मायाप्पा सोंगी भारुडी भजनाचा कार्यक्रम झाला. रविवारी पहाटे काकड आरती, त्यानंतर नित्यपूजा, रात्री कामतगा येथील भारुडी भजन झाले. सोमवारी सकाळी कालाकीर्तन करण्यात आले. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसाद केले होते.

खादरवाडी येथील पांडुरंग सप्ताहानिमित्त सोमवारी गावात टाळ मृदंगाच्या गजरात दिंडी काढण्यात आली. या दिंडीत वारकरी व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिंडीत वारकरी विविध अभंग गाताना दिसत होते. शनिवारपासून सप्ताहाला सुरुवात करण्यात आली. पहाटे काकड आरती व रात्री भजनाचा कार्यक्रम झाला. सोमवारी पालखी प्रदक्षिणा झाली. त्यानंतर दहीहंडी कार्यक्रम झाला. दुपारी 12 नंतर गाऱ्हाणा व महाप्रसाद कार्यक्रम झाले. वाघवडे गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरात रविवारपासून विठ्ठल रखुमाई सप्ताहाला सुरुवात करण्यात आली. पहाटे काकड आरती झाली. यानंतर विठ्ठल-रखुमाई मंदिराची विधीवत पूजा करण्यात आली. दिवसभर विविध कार्यक्रम झाले. सोमवारी पालखी मिरवणूक व दुपारी महाप्रसादाचे आयोजन केले होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat