Dailyhunt
केएटीकडून जयकिसानचे दोन्ही अपील रद्दबातल

केएटीकडून जयकिसानचे दोन्ही अपील रद्दबातल

सुजीत मुळगुंद, राजकुमार टोपण्णावर, अॅड. नितीन बोलबंडी यांची पत्रकार परिषदेत माहिती

बेळगाव : जयकिसान भाजी मार्केटचे रिटपीटीशन उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवून केएटीकडे दाद मागण्याची सूचना केली होती.

त्यानुसार जयकिसान भाजी मार्केटने केएटीकडे अपील केले होते. मात्र त्याठिकाणी वेळेत अपील दाखल करण्यात न आल्याने दोन्ही अपील रद्दबातल ठरविण्यात आले आहेत. एकंदरीत हा शेतकऱ्यांचा विजय असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुजीत मुळगुंद, अॅड. नितीन बोलबंडी, राजकुमार टोपण्णावर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

केएटीने जयकिसान भाजी मार्केटचे दोन्ही अपील रद्दबातल ठरविल्याने याबाबतची अधिक माहिती देण्यासाठी बुधवारी शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. एपीएमसी आवारात सरकारी भाजीमार्केट असतानाही गांधीनगर येथे जयकिसान भाजी मार्केट सुरू करण्यात आले. याविरोधात कायदेशीर लढा दिल्यानंतर सरकारने जयकिसान भाजी मार्केट बंद केले. या विरोधात जयकिसान भाजी मार्केटकडून उच्च न्यायालयात रिटपीटीशन दाखल करण्यात आली. मात्र सदर पीटीशन रद्दबातल ठरवून केएटीकडे अपील करण्याचे निर्देश न्यायालयाकडे देण्यात आले. त्यानुसार जयकिसान भाजी मार्केट आणि तेथील 120 व्यापाऱ्यांनी केएटीकडे अपील केले.

30 दिवसांच्या आत अपील करणे जरुरीचे आहे. मात्र वेळेत अपील दाखल करण्यात आले नाही, असा युक्तिवाद उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील आनंद मंडगी, अॅड. नितीन बोलबंडी यांनी केला. त्यामुळे केएटीने जयकिसान भाजी मार्केटतर्फे दाखल करण्यात आलेले दोन्ही अपील रद्दबातल ठरविले आहेत. एपीएमसी आवारात भाजी मार्केट सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला भाव मिळत आहे. तसेच या मोबदल्यातून सरकारला टॅक्सही मिळत आहे. सुरू करण्यात आलेले संडे मार्केट बंद करण्यात यावे, यासाठी सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. एपीएमसी आवारातच फळ आणि फूल मार्केटही स्थलांतरित झाले पाहिजे, अशी आपली मागणी आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

एपीएमसीत फटाक्यांची आतषबाजी

जयकिसान भाजी मार्केटकडून दाखल करण्यात आलेले दोन्ही अपील केएटीने रद्दबातल केल्याची बातमी एपीएमसी भाजी मार्केटमध्ये धडकताच तेथील व्यापाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा करत फटाक्यांची आतषबाजी केली. गेल्या काही वर्षापासून खासगी भाजी मार्केट विरोधात सुरू असलेल्या लढ्याला यश आल्याचेही यावेळी बोलले जात होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat