Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
केकेआरने रोखली हैदराबादची विजयी घोडदौड

केकेआरने रोखली हैदराबादची विजयी घोडदौड

केकेआरचा सात गड्यांनी विजय : रघुवंशीचे अर्धशतक, सामनावीर वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन यांचा भेदक मारा

वृत्तसंस्था, हैदराबाद

'सामनावीर' वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेन यांची प्रभावी फिरकी गोलंदाजी तसेच अंगक्रिश रघुवंशीच्या अर्धशतकाच्या जोरावर रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या आयपीएल स्पर्धेतील सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने बलाढ्या सनरायझर्स हैदराबादला 7 गड्यांनी तसेच 10 चेंडू बाकी ठेऊन पराभूत केले आणि कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादची गेल्या 5 सामन्यातील विजयी घोडदौड रोखली.

या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हैदराबाद संघाचा डाव 19 षटकात 165 धावांत आटोपला. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने 18.2 षटकात 3 बाद 169 धावा जमवित विजय नोंदविला. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात सनरायझर्स हैदराबादचा संघ 10 सामन्यातून 12 गुणांसह तिसऱ्या स्थानावर असून कोलकाता नाईट रायडर्सचा संघ 9 सामन्यातून 7 गुणांसह आठव्या स्थानावर आहे.

सनरायझर्स हैदराबाद संघाच्या डावाला अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड यांनी बऱ्यापैकी सुरुवात करुन देताना 22 चेंडूत 44 धावांची भागिदारी केली. कोलकाता संघातील गोलंदाज कार्तिक त्यागीने अभिषेक शर्माला ग्रीनकरवी झेलबाद केले. त्याने 10 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 15 धावा जमविल्या. अभिषेक बाद झाल्यानंतर हेड आणि इशान किशन यांनी संघाला 9 षटकाअखेर सुस्थितीत नेताना 105 धावांपर्यंत मजल मारली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 61 धावांची भागिदारी केली. वरुण चक्रवर्तीने हेडला झेलबाद केले. त्याने 28 चेंडूत 3 षटकार आणि 9 चौकारांसह 61 धावा जमविल्या. ट्रेव्हिस हेडचे या स्पर्धेतील हे सलग दुसरे अर्धशतक आहे. पहिल्या 10 षटकांअखेर हैदराबादने 2 बाद 107 धावा जमविल्या होत्या. पण त्यानंतर कोलकाताच्या अचूक गोलंदाजीसमोर हैदराबादने शेवटच्या 10 षटकात 60 धावांमध्ये 8 गडी गमाविले. या स्पर्धेत पहिल्यांदाच हैदराबादचा संघ निर्धारित षटकांच्या आत बाद झाला.

क्लासेनने 1 षटकार आणि 1 चौकारासह 11, रविचंद्रन स्मरणने 1 चौकारासह 4, अंकित वर्माने 1 चौकारासह 6, सलील अरोराने 2 तर कर्णधार पॅट कमिन्सने 8 चेंडूत 1 षटकारासह 10 धावा केल्या. शिवांग कुमारने 1 तर हर्षल पटेलने 1 चौकारासह 6 व मलिंगाने नाबाद 2 धावा केल्या. इशान किशन 16 व्या षटकात सातव्या गड्याच्या रुपात बाद झाला. त्याने 29 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 42 धावा जमविल्या. हैदराबाद संघाने या स्पर्धेत सलग तिसऱ्या सामन्यात पहिल्या 10 षटकात 100 पेक्षा अधिक धावा जमविल्या. हैदराबादच्या डावात 8 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले. हैदराबाद संघाने पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या 6 षटकात 71 धावा जमविताना 1 गडी गमाविला. हेडने 22 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. कोलकाता नाईट रायडर्सतर्फे वरुण चक्रवर्तीने 36 धावांत 3 तर सुनील नरेन आणि कार्तिक त्यागी यांनी प्रत्येकी 2 तसेच वैभव अरोरा, कॅमेरुन ग्रीन व अंकुल रॉय यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अॅलेन यांनी कोलकाता संघाच्या डावाला दमदार सुरुवात करुन दिली. या जोडीने 24 चेंडूत 49 धावांची भागिदारी केली. कमिन्सच्या गोलंदाजीवर अॅलेन क्लासेनकरवी झेलबाद झाला. त्याने 13 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 29 धावा जमविल्या.

कर्णधार रहाणे आणि रघुवंशी या जोडीने 66 चेंडूत 84 धावांची भागिदारी करत आपल्या संघाला विजयाची आशा निर्माण करुन दिली. रहाणेच्या तुलनेत रघुवंशीने आक्रमक फटके मारले. अजिंक्य रहाणेने 36 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 43 धावा जमविल्या. साकिब हुसेनने त्याला झेलबाद केले. 15 षटकाअखेर कोलकाता संघाने 2 बाद 133 धावा जमविल्या होत्या. कोलकाता संघाला शेवटच्या 5 षटकात विजयासाठी 33 धावांची गरज होती. रघुवंशीने 47 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 59 धावा झळकाविल्या. शिवांग कुमारच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात रघुवंशी मलिंगाकरवी झेलबाद झाला. त्याने 47 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 59 धावा जमविल्या. रघुवंशी बाद झाला त्यावेळी कोलकाता संघाला विजयासाठी केवळ 11 धावांची गरज होती. रघुवंशीने अर्धशतक 39 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने झळकाविले. रिंकू सिंग आणि ग्रीन यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. रिंकू सिंगने केवळ 11 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 22 तर ग्रीनने नाबाद 3 धावा केल्या. कोलकाता संघाच्या डावामध्ये 6 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. या स्पर्धेत रहाणेने यापूर्वी झालेल्या 8 सामन्यात केवळ 1 अर्धशतक झळकाविले होते. रिंकू सिंगने विजयी चौकार ठोकला. हैदराबाद संघातर्फे कमिन्स, शिवांगकुमार आणि साकिब हुसेन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

सुनील नरेनने आयपीएल स्पर्धेत बळींचे द्विशतक पूर्ण केले. त्याचा हा 197 वा सामना होता. यापूर्वी आयपीएल स्पर्धेत भुवनेश्वर कुमारने 199 सामन्यात 215 बळी तसेच यजुवेंद्र चहलने 182 सामन्यात 228 बळी नोंदविले आहेत. 200 बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आता सुनील नरेन तिसरा गोलंदाज आहे. हैदराबाद संघाविरुद्धच्या रविवारच्या सामन्यात इशान किशन हा सुनील नरेनचा दोनशेवा बळी ठरला.

संक्षिप्त धावफलक - सनरायझर्स हैदराबाद 19 षटकात सर्वबाद 165 (हेड 61, ईशान किसन 42, अभिषेक शर्मा 15 क्लासन 11, कमिन्स 10, वरुण चक्रवर्ती 3-36, सुनील नरेन 2-31, कार्तिक त्यागी 2-30, वैभव अरोरा, ग्रीन व अंकुल रॉय प्रत्येकी 1 बळी), कोलकाता नाईट रायडर्स 18.2 षटकात 3 बाद 169 (अजिंक्य रहाणे 43, अॅलेन 29, रघुवंशी 59, रिंकू सिंग नाबाद 22, ग्रीन नाबाद 3, अवांतर 13, कमिन्स, शिवांगकुमार व साकिब हुसेन प्रत्येकी 1 बळी).

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat