नागरिक हैराण, दिवसा उन्हाचे चटके तर रात्रीही प्रचंड उकाडा : पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर
खानापूर : खानापूर तालुक्यात एप्रिल महिन्याच्या मध्यापासून उष्णतेचा प्रचंड तडाखा जाणवत असून यावर्षी उष्णतेने उच्चांक गाठलेला आहे.
परिसराचे तापमान दिवसेंदिवस वाढत असल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. दुपारच्या वेळेत नागरिक बाहेर पडणे टाळत आहेत. त्यामुळे याचा परिणाम बाजारपेठेवरही दिसून येत आहे. या उष्णतेपासून सुटका करून घेण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून शहरात कलिंगड, काकडी तसेच फळांच्या दुकानात आणि शहाळ्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. शहरातील शितपेयांच्या दुकानात रात्री उशिराही गर्दी दिसून येत आहे. तालुक्यात अलीकडच्या काहीवर्षात वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. गेल्या काहीवर्षापासून उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे.
एप्रिल, मे महिन्यात सरासरी तापमान 38 ते 40 डिग्री रहात आहे. यापूर्वी तालुक्यात एप्रिल आणि मे हे दोन महिने उष्णता जाणवत होती. खानापूर तालुक्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागात घनदाट जंगले असल्याने यापूर्वी 33 डिग्री सेल्सियस तापमान झाले तर वळिवाचे पाऊस होत होते. मात्र अलीकडे बदललेल्या वातावरणामुळे कमालीची उष्णता वाढल्यानंतरही वळिवाचे पाऊस होत नाहीत. यापूर्वी रात्री हवेत गारवा जाणवत होता. मात्र यावर्षी एप्रिल महिन्यापासूनच तापमान 38 ते 40 डिग्री सेल्सियस रहात असल्याने दिवसा उन्हाचे चटके आणि रात्री उकाडा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या उकाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी रात्री उशिरा लोक रस्त्यावरून फिरताना दिसत आहेत. या वातावरणाचा परिणाम झोपेवरही झाला आहे.
उन्हामुळे पाणी स्त्राsतात घट
गेल्या महिन्याभरापासून उष्णतेने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे तालुक्यातील पाणीपातळीची झपाट्याने घट झाली असून नदीनाल्यांची पातळी पूर्णपणे घटली असून जलस्त्रोतावर फार मोठा परिणाम दिसून येत असून नदी नाले पूर्णपणे कोरडे पडले आहेत. तर विहिरीच्या पाणीपातळीने तळ गाठला आहे. कूपनलिकांचे पाणी मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. याचा परिणाम सर्वत्र दिसून येत असून अनेक ठिकाणी भीषण पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. तालुक्यात काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तर अनेक गावातून शेतातील कूपनलिकांवर पाण्याची भिस्त अवलंबून आहे. नदी नाले कोरडे पडल्याने पाळीव जनावरांनाही पाण्यासाठी त्रास होत आहे. याचा परिणाम दूध उत्पादनावरही दिसून येत आहे. तसेच या प्रचंड उष्णतेचा परिणाम पिकावरही झाला आहे.
पाणीटंचाई होण्याची शक्यता
पुढील काही दिवसात तालुक्यातील करंजाळ, इदलहोंड, कक्केरी, संगरगाळी, रुमेवाडी, करंबळ, शिरोली, हेब्बाळ, कोकण नावगा, शिवाजीनगर, अवरोळी, लिंगनमठ, केरवाड, बिदरभावी, बैलूर, तीर्थकुंडये, हुळंद, सातनाळी, वाटरे, वरकड, गवळीवाडा, हारुरी, गोल्याळी, हब्बनहट्टी, मलवाड, दोड्डहोसूर, यडोगा, लक्केबैल या ठिकाणी पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत अधिकाऱ्यांनी ग्राम पंचायतींना या गावांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचे निर्देश दिले आहेत.
उष्णतेमुळे आरोग्याच्या समस्या
गेल्या महिन्याभरापासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला असून उष्णतेने उच्चांक गाठलेला आहे. शहरासह ग्रामीण भागातील पाणीपातळी घटल्याने तसेच उष्णतेचा कहर झाल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. डोकेदुखी, चक्कर येणे, सर्दी तसेच शरीरातील पाण्याची पातळी कमी होत असल्याने होणाऱ्या आजारात वाढ झाली आहे. त्यामुळे डॉक्टरांनीही उष्णतेपासून विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
पाणीटंचाई निवारणासाठी हेल्पलाईन
प्रशासनाकडून तालुक्यातील पाणीटंचाई निवारणासाठी हेल्पलाईन सरू करण्यात आली असून ज्या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासल्यास 08336-222225 आणि 08336-223593 या क्रमाकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

