कोल्हापुर - प्रभारी विभागीय उपनिबंधक नारायण परजणे यांनी जाहीर केलेल्या निकालानंतर सहाय्यक निबंधक कार्यालयात सोमवारी संध्याकाळी अपात्र झालेल्या संस्था प्रतिनिधींच्या संतापाचा उद्रेक झाला.
कोणाच्या सांगण्यावरून निकाल दिला, किती रुपयांत सौदा केला, असा जाब विचारत परजणे यांना अक्षरक्षः शिव्यांची लाखोली वाहिली. कॉपी पेस्ट निकाल आहे, आता सर्वोच्च न्यायालयात जाऊन निकाल आणणार आणि तुम्हाला न दुग्धाभिषेक घालूनच येथून पवित्र करून पाठवणार, असा सज्जड दमही संस्था प्रतिनिधींनी दिल्याने आता निवडणूक वेगळ्या टप्प्यावर आल्याचे संकेतच मिळाले. निकाल जाहीर झाल्यानंतर संध्या. ५.३० च्या सुमारास संस्था प्रतिनिधींसह नेतेमंडळी सहाय्यक निबंधक कार्यालयात दाखल झाली.
यावेळी संस्था प्रतिनिधींनी उपनिबंधक परजणे यांना चांगलेच धारेवर धरले. निकालाचा दिवस असताना दिवसभर कार्यालयात तुम्ही का नव्हता, आवक जावक नोंद वहीतही तुम्ही कोठे फिरतीवर गेला होता, याची काहीच नोंद नाही, मग कुठल्या ठिकाणी गेला होता, कुणाच्या सांगण्यावरून निकाल तयार केला. तुम्ही फक्त ५.३० वा. येऊन निकालपत्रावर सह्या केल्या, मग याआधी कुणी आणि कुठेही बसून निकाल तयार केला, अशी प्रश्नांची सरबत्तीच संस्था प्रतिनिधींनी केली. यावर उपनिबंधक परजणे हे देखील निरुत्तर झाले. गप्प बसू नका, बोला, तुम्हाला सोडणार नाही, येथून कसे बाहेर पडता ते बघतोच असा पवित्रा घेत संस्था प्रतिनिधींनी आयएनजे नोंद असतानाही संस्था कशा काय अपात्र ठरवल्या ते सांगा, असे विचारत त्यांच्यासमोर कागदच टाकले. राधानगरी, कागल, करवीर, पन्हाळ्यातील संस्थांचा कोणताही एक अहवाल बाहेर काढा, मग सत्य काय आहे, ते दाखवतो असा दम दिला.
.
म्हणूनच वहा मिनिटांत अधिकारी बदलला का?
–
विभागीय उपनिबंधक देवीदास मिसाळ यांच्या जागेवर हातकणंगलेचे उपनिबंधक नारायण परजणे यांची प्रभारी म्हणून तात्पुरती नियुक्ती झाली. अवघ्या १० मिनिटांत झालेल्या या नियुक्तीमागे या संस्था अपात्र करण्याचेच षडयंत्र होते, असा आरोप विकास पाटील यांनी केला.
तुझे तो याद रखूँगा…
निकालानंतर प्रताप ऊर्फ भैय्या माने यांच्या संतापाचा कडेलोटच झाला. त्यांनी विभागीय उपनिबंधक नारायण परजणे यांच्या अंगावर धावून जात थेट एकेरीवर येऊन शिव्यांची लाखोलीच वाहिली, येथून कसा बाहेर पडतोस आणि पुढे कुठल्या पदापर्यंत जातोस ते बघतोच, असा दमही दिला. तुझे तो याद रखूँगा असे ठणकावून सांगत वातावरण अधिकच तापवले.

