वार्ताहर/कणकुंबी
बेटणे येथील श्री हनुमान स्पोर्ट्स क्लब आयोजित जांबोटी विभागातील एक गाव एक संघ अशी मर्यादित षटकांची क्रिकेट स्पर्धा खास हनुमान जयंतीच्या निमित्ताने व्यवसायिक बबन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.या स्पर्धेत बेटणेच्या हनुमान क्रिकेट संघाने विजेतेपद पटकाविले.
खानापूर तालुक्याच्या आमदारांच्या सौजन्याने सदर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक 40 हजार रुपये व चषक बेटणे हनुमान स्पोर्ट्स संघाने पटकावले तर द्वितीय पारितोषिक 20 हजार रुपये व चषक बैलूरच्या शिवशक्ती क्रिकेट संघाने पटकावले. तसेच स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकापैकी मालिकावीर म्हणून बेटणे संघाचा विनायक गावडे व उत्कृष्ट फलंदाज म्हणून बैलूर संघाचा किशन पाटील व उत्कृष्ट गोलंदाज म्हणून बेटणे संघाचा लक्ष्मण गावडे यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. शिस्तबद्ध संघ म्हणून ओलमणी संघाची निवड करुन गौरविण्यात आले. अंतिम सामना सामनावीर म्हणून बेटणे संघाचा मुकुंद गावडे याला देण्यात आले. क्रिकेट स्पर्धेमध्ये एकूण 28 संघांनी भाग घेतला होता.

