Dailyhunt
महिलांच्या टी-20 क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचे अव्वल स्थान कायम

महिलांच्या टी-20 क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचे अव्वल स्थान कायम

वृत्तसंस्था, दुबई

वार्षिक क्रमवारी अद्ययावत केल्यानंतर आयसीसी महिला टी-20 सांघिक क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व कायम आहे. इंग्लंडवर 12 गुणांची आघाडी घेत त्यांनी आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 कडे वाटचाल करताना अव्वल संघ म्हणून आपली स्थिती आणखी मजबूत केली आहे.

आयसीसीच्या नियमांनुसार या वार्षिक क्रमवारीत अद्यतनामध्ये मे 2025 पासून खेळल्या गेलेल्या सामन्यांना पूर्ण 100 टक्के महत्त्व दिले जाते तर मागील दोन वर्षांतील निकालांना अर्धे 50 टक्के महत्त्व दिले जाते. ताज्या आयसीसी महिला टी-20 क्रमवारीत ऑस्ट्रेलिया 287 गुणांसह अव्वल स्थानी आहे. त्यानंतर इंग्लंड आणि भारत अनुक्रमे 275 आणि 264 गुणांसह दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत. या क्रमवारीतील पहिल्या 16 संघांच्या स्थानांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाचे विद्यमान विजेते असलेल्या न्यूझीलंडचा संघ 253 गुणांसह चौथ्या स्थानी आहे तर दक्षिण आफ्रिका 243 गुणांसह पाचव्या स्थानी असून या दोन संघांनी मिळून अव्वल पाच संघांची यादी पूर्ण केली आहे.

वेस्ट इंडिज-238 आणि श्रीलंका-237 अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या स्थानी आहेत. या दोन्ही संघांमध्ये केवळ एका गुणांचे अंतर आहे. पाकिस्तान 216 गुणांसह आठव्या स्थानी कायम आहे तर आयर्लंड 200 आणि बांगलादेश 199 यांनी अव्वल 10 संघांची यादी पूर्ण केली आहे. या दोन संघांमध्येही पुन्हा एकदा केवळ एका गुणाचेच अंतर आहे.

इतर बदलांमध्ये पहिल्या आयसीसी महिला टी-20 चॅलेंज ट्रॉफीचे विजेते असलेल्या अमेरिका संघाने दोन स्थानांची प्रगती करत 22 व्या स्थानावरुन 20 व्या स्थान गाठले आहे. जर्मनीनेही क्रमवारीत सुधारणा केली असून 10 रेटिंग गुण मिळवत त्यांनी 56 वरुन 66 गुणांपर्यंत मजल मारली आहे. सहा स्थानांची झेप घेत त्यांनी अव्वल 30 संघांच्या यादीत 29 व्या स्थानी प्रवेश केला आहे. या ताज्या वार्षिक क्रमवारीत एकूण 78 संघांचा समावेश आहे. या सर्व संघांनी गेल्या तीन वर्षांत किमान 8 टी-20 सामने खेळलेले आहेत. कंबोडियाचा संघ क्रमवारीतून बाहेर पडला असून आपले स्थान पुन्हा मिळवण्यासाठी त्यांनी आणखी चार सामने खेळावे लागतील. तर पेरु संघाने गेल्या तीन वर्षांत एकही सामना न खेळल्यामुळे त्यांचा आता क्रमवारीमध्ये समावेश नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat