भारतात श्रद्धा आणि संपत्ती यांचा संबंध शतकानुशतके जुना आहे. देशातील मंदिरे केवळ पूजापाठ करण्याची ठिकाणे नाहीत, तर प्रमुख धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक संस्थादेखील आहेत. अनेक मंदिरांनी भक्तांकडून मिळालेल्या दान-देणग्या, जमिनी, सोने-चांदी आणि गुंतवणुकीद्वारे प्रचंड खजिना जमा केला आहे.
काही मंदिरांची संपत्ती इतकी प्रचंड आहे की, त्यांचा समावेश जगातील सर्वात श्रीमंतधार्मिक स्थळांमध्ये केला जातो. 2026 सालापर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे भारतातील 10 सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये 9 लाख कोटी रुपयांपर्यंतची संपत्ती असल्याचे उघड झाले आहे. मंदिरांमधील या प्रचंड संपत्तीचा आणि येथील धार्मिक महत्वाचा घेतलेला हा आढावा.
जागतिक संपत्ती निर्देशांक 2026 नुसार, तिरुपती बालाजी मंदिर हे जगातील तिसरे सर्वात श्रीमंत धार्मिक स्थळ असून त्याची जंगम आणि स्थावर मालमत्ता 3.38 लाख कोटी रुपयांची आहे. तिरुपती मंदिराच्या उत्पन्नाचा एक मोठा भाग देशभरातील विविध बँकांमध्ये जमा असलेल्या 11 टनांहून अधिक सोन्याच्या साठ्यावर मिळणाऱ्या व्याजातून येतो.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार तिरुपती मंदिराची एकूण संपत्ती सायप्रस, आइसलँड आणि एस्टोनियासह 100 लहान देशांच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे. मंदिराला नियमित आणि विशेष प्रसंगी सरासरी 1 ते 5 कोटी रुपयांची देणगी मिळते. यावर्षी 17 मार्च या एकाच दिवसात 4.88 कोटी रुपयांची देणगी मिळाल्याची माहितीही जारी करण्यात आली होती.
तिरुपती बालाजी मंदिराप्रमाणेच केरळमधील पद्मनाभस्वामी मंदिर प्राचीन खजिन्याच्या बाबतीत सर्वात श्रीमंत आहे. त्याची 99 टक्के संपत्ती सोन्याच्या मूर्ती, नाणी आणि हिऱ्यांसह 'प्राचीन' खजिन्याच्या स्वरुपात आहे. आज त्याचे बाजारमूल्य दोन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या सर्व संपत्तीला सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाचे संरक्षण मिळालेले आहे हेही विशेष.
सोन्याला झळाळी येताच मंदिराच्या संपत्तीतही वाढ
मार्च 2024 पासून प्रमुख धार्मिक स्थळांच्या एकूण संपत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे. पण याचे मुख्य कारण सोने हे आहे. दोन वर्षांपूर्वी सोन्याचा भाव प्रतितोळा सुमारे 65,000 रुपये होता. आज तो 1.50 लाख रुपये प्रतितोळा झाला आहे. अशाप्रकारे या दोन वर्षांत तिरुपती मंदिराच्या संपत्तीत 35 टक्क्यांनी, पद्मनाभस्वामी मंदिराच्या संपत्तीत 100 टक्क्यांनी आणि जगन्नाथ पुरी मंदिराच्या संपत्तीत अंदाजे 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तथापि या मंदिरांना मिळणाऱ्या रोख देणग्यांमध्ये केवळ 10 ते 12 टक्के इतकीच वाढ झाली आहे.
कोणत्या मंदिरांमध्ये किती सोने ?
पद्मनाभस्वामी मंदिरात 1,500 टन सोने आहे. तिरुपती बालाजी मंदिरात 11.3 टन, वैष्णोदेवी मंदिरात अंदाजे 1.2 टन, सुवर्ण मंदिरात 900 किलो, काशी विश्वनाथ मंदिरात 940 किलो, शिर्डीतील साईबाबा मंदिरात 400 किलो, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात 160 किलो, जगन्नाथ मंदिरात 130 किलो, सोमनाथ मंदिरात 160 किलो आणि अयोध्येतील राम मंदिरात अंदाजे 60 किलो सोने आहे.
पुरीच्या जगन्नाथ मंदिराकडे 60 हजार एकर जमीन
पुरी येथील जगन्नाथ मंदिर हे भारतातील सर्वात जास्त जमीन असलेल्या धार्मिक संस्थांपैकी एक मानले जाते. मंदिर ट्रस्टकडे 60 हजार एकरपेक्षा जास्त जमीन आहे. ही जमीन ओडिशाच्या 30 पैकी 24 जिह्यांमध्ये विस्तारलेली आहे. ओडिशाव्यतिरिक्त इतर सहा राज्यांमध्येही मंदिराच्या मालकीची 395 एकर जमीन आहे. मंदिराचा खजिना, जमीन आणि इतर जंगम व स्थावर मालमत्तेचे मूल्य 1.2 लाख कोटी रुपये आहे. त्याच्या रत्न भांडार खजिन्यात ठेवलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे नेमके मूल्य अद्याप निश्चित झालेले नाही. ही संपत्ती शतकानुशतके चालत आलेल्या देणग्या आणि राजांकडून मिळालेल्या अनुदानातून प्राप्त झाली आहे.
श्री राम मंदिराला दररोज अंदाजे एक कोटींची देणगी
अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिरात गेल्या दोन वर्षांत वेगाने परिवर्तन झाले आहे. मंदिराच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत देणग्या आणि बँक ठेवींवरील व्याज आहे. मंदिर ट्रस्टनुसार, 2023-24 मध्ये एकूण उत्पन्न 376 कोटी रुपये होते. म्हणजेच सरासरी दैनिक उत्पन्न अंदाजे एक कोटी रुपये होते. मंदिराचा मुख्य परिसर अंदाजे 70 एकरचा आहे. मंदिराच्या स्थावर मालमत्तेमध्ये सुमारे 70 एकरचा मुख्य परिसर आणि आजुबाजूच्या संपादित जमिनीचा समावेश आहे. या व्यतिरिक्त बांधकाम सुरू असलेल्या भव्य वास्तुचा बांधकाम खर्चच 1,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या सर्व संपत्तीचे मूल्यांकन केल्यास एकूण मालमत्ता 6,000 कोटी ते 8,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचते.
केरळचे श्री पद्मनाभस्वामी मंदिर
केरळमधील तिरुवनंतपुरम येथील श्री पद्मनाभस्वामी मंदिर हे केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्वात श्रीमंत मंदिर मानले जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्याच्या भूमिगत तिजोऱ्यांची तपासणी केल्यानंतर संपूर्ण जगच आश्चर्यचकीत झाले. सोन्याच्या मूर्ती, हिऱ्यांनी जडवलेले दागिने, प्राचीन नाणी आणि दुर्मीळ कलाकृती उघडकीस आल्या. केवळ एका तिजोरीत असलेल्या खजिन्याचे मूल्य 1.2 लाख कोटींहून अधिक असल्याचा अंदाज आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व विचारात घेतल्यास त्याचे खरे मूल्य खूपच जास्त असल्याचे तज्ञांचे मत आहे.
तिरुमला तिरुपती व्यंकटेश्वर मंदिर, आंध्र प्रदेश

तिरुपती बालाजी मंदिर हे देशातील सर्वात पारदर्शक आणि सुसंघटित धार्मिक संस्थांपैकी एक मानले जाते. तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) द्वारे चालविल्या जाणाऱ्या या मंदिराची एकूण मालमत्ता 2.50 लाख कोटींहून अधिक असल्याचा अंदाज आहे. दानपेट्यांमध्ये दररोज कोट्यावधी रुपये जमा होतात आणि लाडू प्रसादाची विक्री व भक्तांच्या केसांच्या लिलावातूनही भरीव महसूल मिळतो.
शिर्डी साईबाबा मंदिर, महाराष्ट्र

शिर्डीमधील साईबाबा मंदिर ट्रस्ट हेसुद्धा देशातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात सक्रिय धर्मादाय ट्रस्टपैकी एक मानले जाते. याचे वार्षिक उत्पन्न साधारणपणे 400 ते 480 कोटी असते. येथे हिंदू, मुस्लीम, भारतीय आणि परदेशी अशा सर्व धर्मांच्या लोकांकडून देणग्या दिल्या जातात. या मंदिराचे महत्वपूर्ण योगदान म्हणजे रुग्णालये, मोफत भोजन, शिक्षण आणि सामाजिक कल्याणावर भरीव निधी खर्च केला जातो.
वैष्णोदेवी मंदिर, जम्मू काश्मीर
काश्मीरमधील त्रिकूट पर्वतावरील माता वैष्णोदेवी मंदिरात दरवर्षी एक कोटीहून अधिक भक्त दर्शनासाठी पोहोचतात. वैष्णोदेवी तीर्थक्षेत्र मंडळाद्वारे चालविल्या जाणाऱ्या या मंदिराचे वार्षिक उत्पन्न 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. ही रक्कम देणग्या, प्रसाद आणि दानपेट्यांमधून गोळा होते. या पैशांचा विनियोग रस्ते, इमारती, रुग्णालये, विद्यापीठे आणि यात्रेकरूंच्या सुविधांसाठी केली जाते.
सुवर्ण मंदिर, पंजाब
अमृतसरमधील सुवर्ण मंदिर हे शीख धर्मातील सर्वात पवित्र स्थळ आहे. त्याचा कलश आणि वरचा भाग अंदाजे 750 ते 1,500 किलो शुद्ध सोन्याने सजवलेला आहे. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे वार्षिक बजेट अनेकदा 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असते. ही समिती दररोज 1,00,000 पेक्षा जास्त लोकांना मोफत लंगर पुरवते. तसेच शिक्षण व वैद्यकीय सेवांवरही मोठी रक्कम खर्च करते.
सिद्धिविनायक मंदिर, मुंबई

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराला उद्योगपती, चित्रपट कलाकार आणि राजकारण्यांकडून भरीव देणग्या मिळतात. वार्षिक देणग्या 100 ते 125 कोटी रुपयांपर्यंत पोहोचतात. मंदिर ट्रस्टच्या बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात मुदत ठेवी आहेत. गर्भगृहातील सोन्याची सजावट मुंबईची समृद्धी दर्शवते.
मीनाक्षी अम्मान मंदिर, तामिळनाडू
मदुराई येथील मीनाक्षी अम्मान मंदिर त्याच्या भव्य वास्तुकला आणि धार्मिक महत्वासाठी प्रसिद्ध आहे. मंदिरात प्राचीन सोन्याचे दागिने आणि हिऱ्यांनी जडवलेले मुकुट असून ते प्रमुख सणांवेळी देवतांना परिधान केले जातात. या मंदिरातील महसुलाचे अचूक आकडे सार्वजनिकरित्या उपलब्ध नसले तरी, हे दक्षिण भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक मानले जाते.
सबरीमला अय्यप्पा मंदिर, केरळ
सबरीमला मंदिर ठराविक महिनेच खुले असले तरीही त्याचा महसूलप्रचंड आहे. मंडळ-मकरविलक्कूच्या हंगामात मंदिराचे उत्पन्न 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. 'अरवण पायसम'ची विक्री हा उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत आहे. 'अरवण पायसम' हा मंदिरातील पवित्र प्रसाद आहे. हा प्रसाद मट्टा तांदूळ, गूळ आणि शुद्ध तुपापासून बनवला जातो. मर्यादित कालावधीत मिळणारे एवढे मोठे उत्पन्न या मंदिराला विशेष बनवते.
सोमनाथ मंदिर, गुजरात

सोमनाथ मंदिर हे श्रद्धा आणि पुनर्बांधणीचे प्रतीक आहे. एका सुसंघटित ट्रस्टद्वारे चालवल्या जाणाऱ्या या मंदिराची मालमत्ता आणि उत्पन्न अनेक कोटी रुपयांचे आहे. मंदिराला भेट देणाऱ्या पर्यटकांची आणि भाविकांची संख्या सातत्याने वाढत आहे. मंदिराच्या उत्पन्नाचा उपयोग देखभाल, पायाभूत सुविधांचा विकास आणि स्थानिक कल्याणकारी कामांसाठी केला जातो.
भारतातील ही श्रीमंत मंदिरे हे दाखवून देतात की येथे श्रद्धा ही केवळ एक आध्यात्मिक शक्ती नसून एक सामाजिक आणि आर्थिक शक्तीदेखील आहे. भक्तांच्या देणग्यांमधून निर्माण झालेली ही संपत्ती केवळ उपासनेतच नव्हे, तर शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवेतही महत्त्वाची भूमिका बजावते.
► धार्मिक स्थळांची 'श्रीमंती'…
तिरुपती बालाजी मंदिर 3.38 लाख कोटी
पद्मनाभस्वामी मंदिर 2.50 लाख कोटी
जगन्नाथपुरी मंदिर 1.20 लाख कोटी
अयोध्या राममंदिर 8,000 कोटी
शिर्डी साईबाबा मंदिर 3,000 कोटी
वाराणसी, काशी विश्वनाथ 3,000 कोटी
जम्मूतील वैष्णोदेवी मंदिर 2,500 कोटी
सोमनाथ मंदिर, गुजरात 1,100 कोटी
मुंबई सिद्धिविनायक मंदिर 800 कोटी
संकलन : जयनारायण गवस.

