अनेक आमदारांचे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना साकडे
. भा. प्रतिनिधी
बेंगळूर :
आषाढ महिना सुरू होण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांनी दिल्लीत लॉबिंग चालविली आहे.
अनेक आमदारांनी वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या असून आपल्याला मंत्रिमंडळात स्थान मिळवून द्यावे, अशी मागणी केली आहे.
काँग्रेस हायकमांडने मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली आहे. 15 जुलैपासून आषाढ महिना सुरू होणार असून 11 किंवा 12 जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांनी मागील तीन दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडले आहे. इच्छुक आमदारांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला आणि इतर वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन मंत्रिपदाची मागणी केली आहे.
तीन-चार वेळा विधानसभेवर निवडून आलेल्या अनेक आमदारांनी मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू केली आहे. पुढील विधानसभा निवडणुकीच्या काही महिने अगोदर मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता नाही. त्यामुळे यावेळीच आपल्याला मंत्रिमंडळात सामावून घ्यावे, अशी मागणी अनेक आमदारांनी केली आहे. मंत्रिपदासाठी काँग्रेसमध्ये दोन डझनहून अधिक आमदार इच्छुक असल्याने चुरस आहे. त्यामुळे कोणाला मंत्रिपद द्यावे, यावरून काँग्रेसश्रेष्ठींची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाचे मुख्य सचिव के. सी. वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला यांनी दोन-तीन फेऱ्यांमध्ये चर्चा केली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकार 3 जून रोजी राज्यात सत्तेवर आले. त्यानंतर शिवकुमार यांच्यासह 13 मंत्र्यांनी शपथ घेतली. सध्या मंत्रिमंडळात 20 जागा रिक्त आहेत. रिक्त जागांसाठी 40 हून अधिक काँग्रेस आमदारांनी मागणी केली असून, मंत्री म्हणून कोणाची निवड करावी, हा प्रश्न काँग्रेसश्रेष्ठींसमोर आहे.
8 रोजी मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी चर्चेसाठी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे 8 जुलै रोजी दिल्लीला जातील. शिवकुमार हे रविवारी दिल्लीला जाणार होते. मात्र, काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी पुढील तीन दिवसांनी विदेश दौऱ्यावरुन दिल्लीला परतणार आहेत. त्यामुळे रविवार ऐवजी ते 8 रोजी दिल्लीला जातील. दोन दिवस तेथेच वास्तव्य करून राहुल गांधींसह प्रमुख नेत्यांशी चर्चा करतील.

