Dailyhunt
म्हापशात सहा दुकानांची लूट

म्हापशात सहा दुकानांची लूट

रोकड, सोन्याच्या अंगठीसह मौल्यवान वस्तू लंपास

 म्हापसा : म्हापसा येथील गजबजलेल्या बाजारपेठेत अज्ञात चोरांनी एकाच रात्री सहा दुकाने फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारात सुमारे 1 लाख रुपयांची रोकड, 1 सोन्याची अंगठी तसेच मौल्यवान वस्तू लंपास करण्यात आल्या असून या चोऱ्यांमुळे व्यापारीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सहाही दुकानांची कुलुपे तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करुन या चोऱ्या केल्या. सलग सहा चोऱ्यांची ही घटना गुऊवार दि. 2 च्या मध्यरात्रीपासून शुक्रवार दि. 3 च्या पहाटेपर्यंतच्या दरम्यान घडली असावी.

शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. ब्रागांझा बेकरी परिसरातील नितीन आरोलकर यांच्या दुकानासह इतर पाच दुकानांना चोरांनी लक्ष्य केल्याचे स्पष्ट झाले. आरोलकर यांच्या दुकानातील गल्ल्यात ठेवलेली 1 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी पळवली. अन्य पाच दुकानांच्या शटरची कुलुपे तोडून चोऱ्या करण्यात आल्या. अन्य एका दुकानात त्यांना प्रवेश करता आला नाही. ज्या दुकानांमध्ये चोऱ्या झाल्या त्यामध्ये डेकोरेशन साहित्य, प्लास्टिक डिस्पोजेबल वस्तू आणि कपड्यांच्या दुकानांचा समावेश आहे. एका दुकानातून सोन्याची अंगठीही चोरीस गेली आहे. इतर दुकानांतील काही वस्तूही लंपास झाल्या आहेत. एका दुकानातून दागिना चोरून नेल्याचे सांगण्यात आले.

 गजबजलेल्या वातावरणातच चोऱ्या

आठवडी बाजार असल्यामुळे गुऊवारी रात्री काही व्यापारी आपल्या मालासह बाजारपेठेतच थांबले होते. गजबजलेल्या वातावरणातही चोरट्यांनी ही चोरी केल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक अजय धुरी व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी दुकानदारांनी तक्रार नोंदवली असून पुढील तपास सुरू आहे.

दुकानांत सीसीटीव्ही नाही

ज्या दुकानांमध्ये चोऱ्या झाल्या त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. त्यामुळे परिसरातील अन्य सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत. चोरटे कोणत्या मार्गाने आले आणि कसे पसार झाले, याचा तपास केला जात आहे. म्हापसा बाजारपेठेतील सहा दुकाने फोडली ही दु:खद घटना आहे. पोलिसांकडून जी गस्तीची सेवा मिळायला पाहिजे, ती मिळत नाही. म्हापशात फक्त घोषणा केल्या जातात, प्रत्यक्षात कृती काहीच होत नाही. सीसीटीव्ही खासदार निधीतून देणार म्हणून घोषणा करण्यात आली होती. अशा गोष्टी पुन्हा घडू नये, यासाठी व्यापारी लक्ष देणार आहेत, असे म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र फळारी म्हणाले. एक व्यापारी पांडुरंग सावंत म्हणाले की, उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी गस्त सुरू केली होती. गस्तीवरील पोलिसांचे फोटो ते पाठवायला सांगायचे, मात्र हा प्रकार आता बंद झाला आहे. सरकार म्हणते सीसीटीव्ही बसवा, मात्र सर्व आम्हीच करायचे काय? आमच्याकडे पैसे कुठे आहे? मग हे पोलिस का पाहिजे? ते आपली ड्युटी लपवितात. तसेंच वेंडर ओळखपत्रे अद्याप देत नाही, असाही आरोप त्यांनी केला.

सकाळी दिसली फोडलेली दुकाने…

सकाळी शुक्रवारी बाजारपेठेत आमटाण घेऊन विक्रीस आलेल्या महिला अनुषा शिंदे (अस्नोडा) म्हणाल्या की, सकाळी आपण आल्यावर आपणास एका दुकानाची एक बाजू उघडी दिसली. लगेच बाजूला असलेल्या महिलेला आपण सांगितले तेव्हा कुलूप तोडल्याचे दिसले. नंतर बाजूच्या दुकानावर पाहिले असता तेथेही कुलूप तोडलेले दिसले. दुकानाचे शटर अर्धवट उघडे होते. नंतर आपण बाजूच्या दुकानदारांना सांगितले असता बाजारपेठेत अन्य दुकानांमध्येही चोरी झाल्याचे उघडकीस आले.

-अनुषा शिंदे

पोलिसांनी फिंगर प्रिंट घ्यायला हवे

आरोलकर स्टोअर्सचे मालक नितीन आरोलकर म्हणाले की, आपल्या दुकानातील लाख रुपये चोरले आहेत. मुख्याधिकाऱ्यांनी बाजारपेठेत येऊन दुकानांच्या सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष द्यावे. सर्व पदपथावर अतिक्रमण झालेले आहे. पोलिस गस्तीबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चोरीचा तपास लावण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी 'फिंगर प्रिंट' घ्यायला हवे होते.

-नितीन आरोलकर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat