Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुंबई संघाकडून चंदिगडला फॉलोऑन

मुंबई संघाकडून चंदिगडला फॉलोऑन

तुषार देशपांडेचे पाच बळी, चंदीगड सर्वबाद 78

वृत्तसंस्था, मुंबई

2026-27 च्या रणजी क्रिकेट हंगामातील येथे सुरू असलेल्या इलाईट ड गटातील सामन्यात सोमवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी चंदीगड विरुद्ध मुंबई संघाची बाजू अधिक भक्कम झाली आहे.

मुंबई संघातील वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने पाच गडी बाद केल्याने चंदीगडचा पहिला डाव केवळ 78 धावांत आटोपला. तत्पूर्वी मुंबईने पहिल्या डावात 429 धावा जमविल्याने चंदीगडला फॉलोऑन स्वीकारावा लागला. चंदीगडने दुसऱ्या डावात खाते उघडण्यापूर्वीच पहिला गडी गमविला.

या सामन्यात मुंबईने 5 बाद 249 या धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांच्या उर्वरित पाच गड्यांनी 180 धावांची भर घातली. 136.5 षटकांत मुंबईचा पहिला डाव 429 धावांवर आटोपला. सिद्धेश लाडने 86, मुशीर खानने 65, तनुष कोटियानने 58, मोहित अवस्थीने 56 धावांचे योगदान दिले. चंदीगडतर्फे बावाने 73 धावांत 4 तर रोहित दंडाने 78 धावांत 4 गडी बाद केले. मुंबई संघातील अवस्थीने आपल्या नाबाद 56 धावांच्या खेळीमध्ये 2 षटकार आणि 6 चौकार ठोकले. तुषार देशपांडेने 2 षटकार आणि 4 चौकारांसह 47 चेंडूत 44 धावा झोडपल्या.

त्यानंतर चंदीगडच्या पहिल्या डावात बिर्लाने 33 धावांचे योगदान दिले. चंदीगडने आपले पहिले सहा गडी केवळ 19.1 षटकांत 29 धावांत गमविले. तुषार देशपांडेने 17 धावांत 5 तर अवस्थीने 9 धावांत 3 गडी बाद केले. फॉलोऑन स्वीकारल्यानंतर चंदीगडने आपले खाते उघडण्यापूर्वीच पहिला गडी गमविला.

संक्षिप्त धावफलक : मुंबई प. डाव 429 (सिद्धेश लाड 86, मुशीर खान 65, कोटियान 58, अवस्थी नाबाद 56, तुषार देशपांडे 44, बावा व दंडा प्रत्येकी 4 बळी), चंदीगड प. डाव सर्वबाद 78 (बिर्ला 33, तुषार देशपांडे 5-17, अवस्थी 3-9), फॉलोऑननंतर चंदीगड दु. डाव 1 बाद 0.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat