Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुसळधार पावसामुळे बेंगळूरवासियांची दैना

मुसळधार पावसामुळे बेंगळूरवासियांची दैना

नजीवन विस्कळीत : अनेक रस्ते जलमय : रहदारी खोळंबल्याने वाहनधारकांची तारांबळ

बेंगळूर : तीव्र उन्हामुळे हैराण झालेल्या बेंगळूरवासियांना बुधवारी पावसामुळे दिलासा मिळाला असला तरी अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले.

वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात अनेक रस्ते जलमय झाले. विविध ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने वीजवाहिन्या, वाहने, होर्डिंग्जची हानी झाली. रस्त्यांवर पाणी तुंबल्याने अनेक ठिकाणी रहदारी विस्कळीत झाली. याचा फटका कार्यालये, कंपन्यांमधून घरी पतरणाऱ्या कामगारांना बसला.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार बेंगळूरमध्ये बुधवारी दुपारी ढगाळ वातावरण होते तर सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह पावसाने शहराला झोडपून काढले. काही ठिकाणी गारपीट झाली. उन्हाच्या उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या बेंगळूरवासियांना दिलासा मिळला असला तरी सलग दोन तास कोसळलेल्या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. सायंकाळनंतरही पावसाच्या हलक्या सरी कोसळतच होत्या.

शांतीनगर, कोरमंगल, रिचमंड सर्कल, इलेक्ट्रॉनिक सिटी, के. आर. मार्केट, मॅजेस्टिक, कार्पोरेशन आणि शिवाजीनगर या भागांना पावसाचा फटका बसला. कार्यालयीन कामे व इतर कामांसाठी बाहेर पडलेले वाहनचालक, रस्ते, फुटपाथवरील व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे दुचाकीस्वारांना उड्डाणपूल आणि मेट्रो रेल्वेस्थानकांच्या खालील भागात आश्रय घ्यावा लागला.

मेट्रो रेल्वेस्थानकात शिरले पाणी

पावसामुळे बेंगळूरमधील बनशंकर मेट्रो रेल्वेस्थानकात पाणी शिरले. के. आर. सर्कलच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली. रुग्णवाहिकेत पाणी शिरल्याने त्यात बिघाड झाल्याने ती रस्त्यातच अडकून पडली. अखेर रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी ती ढकलून रस्त्याकडेला थांबविली. सिल्क बोर्ड येथे पावसाच्या पाण्यामुळे संपूर्ण रस्ता जलमय झाला. रस्त्यावर दोन फुटापर्यंत पाणी साचल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली. एम. जी. रोडजवळील ग्रंथालयात पाणी शिरल्याने लाखो रुपये किमतीच्या पुस्तकांची हानी झाली. सुमारे 5 हजार पुस्तके पाण्याखाली गेल्याचे सांगण्यात आले आहे.

50 हून अधिक झाडे उन्मळून पडली

मुसळधार पावसामुळे बेंगळूर शहरातील 50 हून अधिक झाडे उन्मळून पडली. ग्रेटर बेंगळूर प्राधिकरणाच्या कमांड आणि नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार 50 ठिकाणी झाडे पडल्याच्या तक्रारी दाखल झाल्या. केंपेगौडा रेल्वेस्थानकाजवळ भलामोठा वृक्ष कोसळल्याने अनेक कारचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी घरांवरील, दुकानांसमोरील पत्रे उडून गेले.

शहरात कोठे किती पाऊस

बेंगळुरातील संपंगीरामनगर येथे सुमारे 39 मि. मी. पावसाची नोंद झाली. त्याचप्रमाणे पुलकेशीनगरमध्ये 36.50 मि. मी., बोम्मनहळ्ळी येथे 31 मि. मी., कॉटनपेठ येथे 29 मि. मी., एचएएल विमानतळ परिसरात 25 मि. मी., बीटीएम लेआऊट 22.50 मि. मी., मारतहळ्ळी येथे 18.50 मि. मी. पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

विधानसौधमधील विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात पाणीच पाणी

अवकाळी पावसाचा फटका केवळ शहरवासियांनाच नव्हे; तर विधानसौध इमारतीलाही बसला. विधानसौध इमारतीच्या बाल्कनीमध्ये पावसाचे पाणी साचले. त्यामुळे अधिकारी आणि तेथे कामासाठी आलेल्या नागरिकांना पाण्यातूनच चालत जाण्याची परिस्थिती निर्माण झाली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्या कार्यालयात पाणी शिरले. त्यामुळे पाणी बाहेर काढताना येथील कर्मचाऱ्यांनी दमछाक झाली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat