Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ऑपरेशन सिंदूर स्वेच्छेने थांबवले!

ऑपरेशन सिंदूर स्वेच्छेने थांबवले!

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा दावा : अणुहल्ल्याची भीती नसल्याचीही स्पष्टोक्ती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताने ऑपरेशन सिंदूर स्वेच्छेने आणि स्वत:च्या अटींवर थांबवण्याचा निर्णय घेतला, असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पुन्हा एकदा निक्षून सांगितले.

भारत एका मोठ्या युद्धासाठी पूर्णपणे तयार होता आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता देशाकडे होती, असेही ते पुढे म्हणाले. दिल्लीत आयोजित राष्ट्रीय सुरक्षा शिखर परिषद 2.0 ला संबोधित करताना राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला 'आंतरराष्ट्रीय दहशतवादाचे केंद्र' असे संबोधताना दहशतवादाची मुळे पूर्णपणे उखडून टाकणे आवश्यक असल्याचे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचे धोरण आता शून्य सहनशीलतेचे आहे. भारत आता दहशतवादी हल्ल्यांवर केवळ राजनैतिक निवेदनांपुरता मर्यादित राहत नाही, तर निर्णायक कारवाई करतो. ऑपरेशन सिंदूरदरम्यान आम्ही त्याच ठिकाणांना लक्ष्य केले जिथून भारतावर हल्ले केले जात होते. आम्ही हे ऑपरेशन क्षमतेच्या अभावामुळे थांबवले नाही, तर आमच्या स्वत:च्या अटींवर स्वेच्छेने थांबवले, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. ऑपरेशन सिंदूर केवळ 72 तासांत पूर्ण झाले असले तरी, त्याची तयारी बऱ्याच काळापासून सुरू होती. ऑपरेशन सिंदूर हे या तत्त्वाचे एक मूर्त उदाहरण आहे, जे भारताची नवीन सामरिक क्षमता जगाला दर्शवते, असेही ते पुढे म्हणाले.

दीर्घ युद्धाची तयारी, मजबूत लष्करी क्षमता

भारताची लष्करी क्षमता सातत्याने मजबूत झाली आहे. गरज पडल्यास तिचा वेगाने विस्तार केला जाऊ शकतो, असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले. भारतावर कोणत्याही अणुबॉम्बच्या धोक्याचा परिणाम झालेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. भारताची लष्करी क्षमता दिवसेंदिवस वाढत असून आता आम्ही आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करत आहोत. सरकारकडून भारतीय कंपन्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. संरक्षण दलासाठी वापरली जाणारे विविध उपकरणे देशातच तयार होऊन देश आत्मनिर्भर व्हावा, ही सरकारची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

पाकिस्तान दहशतवादाचे जागतिक केंद्र

राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानवर निशाणा साधत म्हटले की, शत्रूराष्ट्र सातत्याने दहशतवादाला पाठिंबा देत आहे. भारत आणि पाकिस्तान एकाचवेळी स्वतंत्र झाले. आज भारत माहिती तंत्रज्ञानासाठी ओळखला जातो. तर दुसरीकडे, पाकिस्तान आंतरराष्ट्रीय दहशतवादाचे केंद्र बनले आहे. भारताचे लष्करी औद्योगिक संकुल युद्धकाळातही जलद पुरवठ्यासाठी सज्ज आहे. पाकिस्तानवर दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करत ते म्हणाले की, दहशतवाद केवळ ऑपरेशनल स्तरावरच नव्हे, तर वैचारिक आणि राजकीय स्तरावरही पसरतो. दहशतवादाची राजकीय आणि वैचारिक मुळे हीच त्याची खरी ताकद आहे आणि ती नष्ट करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादनही संरक्षणमंत्र्यांनी केले.

स्वदेशी शस्त्रास्त्रांवर विश्वास

आज भारताची वाढीव क्षमता आणि साठवणूक क्षमता त्याच्या लष्करी सामर्थ्यात महत्त्वाची भूमिका बजावते. याव्यतिरिक्त स्वदेशी शस्त्रास्त्रांच्या वाढत्या विश्वासार्हतेने भारताची प्रतिबंधक क्षमता आणखी मजबूत केली आहे. हे सर्व घटक मिळून भारताचे सामरिक स्थान मजबूत करतात आणि त्याला कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास सक्षम करतात, असेही राजनाथ सिंह म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat