अमेरिकेतील आयोव्हा प्रांतात एका कुटुंबाच्या संदर्भात एक अत्यंत अद्भूत घटना घडली आहे. या कुटुंबाच्या गेल्या सलग पाच पिढ्यांमधील कोणाचा ना कोणाचा जन्म एकाच दिनांकाला झाला आहे. सध्या प्रेड हार्लो हे या कुटुंबाचे कर्ते पुरुष आहेत.
त्यांचे आजोबा विल्बर हार्लो, त्यांची माता एडी हार्लो, त्यांची कन्या एम्मा बेल आणि नातू ऑर्थर या साऱ्यांचा जन्म 14 सप्टेंबर या एकाच दिनांकाला झालेला आहे. या कारणासाठी या कुटुंबाची नोंद 'गिनीज' विक्रम पुस्तिकेत करण्यात आली आहे. प्रेड हार्लो यांची कन्या एमा बेल यांना जेव्हा दुसरे अपत्य झाले, तेव्हा हा विक्रम नोंदला गेला आहे. ऑर्थर याच्या जन्मापूर्वी हार्लो यांच्या कुटुंबाच्या चार पिढ्यांमधील कोणाना कोणाचा जन्म 14 सप्टेबरला झालेला होता. तथापि, त्यावेळी तो जागतिक विक्रम नव्हता. कारण आणखी एका कुटुंबाच्या संदर्भात चार पिढ्या एकाच दिनांकाला जन्माला आलेली घटना घडलेली होती.
ऑर्थरच्या जन्मानंतर मात्र, या कुटुंबाने हा जागतिक विक्रम नोंदविला आहे. मात्र, केवळ सलग पाच पिढ्यांमधील कोणाचा ना कोणाचा जन्म एकाच दिनांकाला होणे, हेच या विक्रमाचे एकमेव वैशिष्ट्या नाही. तर या जन्मांचा अनुक्रमही महत्वाचा ठरत आहे. पुरुष, स्त्री, पुरुष, स्त्री आणि पुरुष अशा अनुक्रमाने हे जन्म झालेले आहेत. हा एक नवा विक्रम आहे. हा योगायोग विलक्षण आश्चर्यकारक आहे, असे या परिवाराचे म्हणणे आहे. अशा प्रकारे एकाच विक्रमात हे दोन विक्रम सामावलेले असतील, अशी पुसट शक्यताही या कुटुंबाला वाटत नव्हती. जेव्हा या कुटुंबाच्या चौथ्या पिढीत 14 सप्टेंबरला एका पुरुष बालकाचा जन्म झाला, तेव्हा आपले कुटुंब या संदर्भातील विक्रम करु शकते, याची जाणीव प्रेड हार्लो यांना झाली होती. तथापि, हा विक्रम होणार की नाही, हे त्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणाच्या हाती नव्हते. कारण कोणाचा जन्म केव्हा होईल, याची कोणतीही निश्चिती नसते. ही घटना अपोआपच झाली आहे. त्यामुळेच हा योगायोग या कुटुंबासाठी आणि या कुटुंबाच्या परिचितांसाठी कौतुकाचा विषय आहे. विशेषत: ऑर्थरच्या जन्मानंतर या कुटुंबावर त्याच्या परिचितांकडून आणि परिचय नसलेल्यांकडूनही अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

