शहरातील २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमित होणार
पंढरपूर : येथील देऊळ भागातील लोकांची उपेक्षा सुरू असून दोन दिवसांपूर्वी शहरातील २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमित होणार असल्याचे वृत्त धडकल्याने मंदिर परिसरातील स्थानिक लोकांमध्ये मग आम्ही काय घोडे मारले आहे?
अशी भावना निर्माण झाली असून सध्या सोशल मीडियावर याचीच चर्चा सुरू आहे.
अतिक्रमण करून जमिनी हडप करणाऱ्यांना सरकार आणि प्रशासन संरक्षण देत आहे आणि देऊळ भागात ८० ते ९० वर्षांपासून नियमित, प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या स्थानिक मूळ लोकांना हाकलून लावले जात आहे. हा अन्याय आजचा नसून सुमारे चाळीस वर्षांपासून मंदिर परिसरातील लोकांना भयाच्चा वातावरणात जगावे लागत आहे.
१९८२ साली मास्टर प्लॅन होऊन या भागातील शेकडो वाडे, जुन्या पद्धतीची घरे जमीनदोस्त करण्यात आली. त्याचा योग्य मोबदला देखील देण्यात आला नाही. ज्यांची घरे गेली आहेत त्यांना भक्तीमार्ग परिसरात विस्थापित नगर येथे प्लॉट्स देण्यात आले होते. मात्र अनेकांना एवढ्या वर्षानंतरही आपल्या हक्काच्या जागा सापडत नाहीत.
कित्येक विस्थापित लोकांच्या जागेवर अतिक्रमण झाले असून शेकडो झोपडपट्ट्या निर्माण झाल्या आहेत. मात्र या अनधिकृत झोपड्या, घरे काढण्याचे धाडस आजपर्यंत न. पा. प्रशासन किंवा महसूल प्रशासनास झालेले नाही. १९९५ साली देखील प्रदक्षिणा मार्गावरील गांधी रोड, नाथ चौक, भजनदास चौक, काळा मारुती, सहकार चौक, दत्त घाट, कलिकादेवी चौक, तांबडा मारुती, महाद्वार, चौफाळा या भागात रस्ता रुंदीकरण करण्यात आले.
यामध्ये दुकाने, घरे पाडण्यात येऊन १० ते ३० फुटांपर्यंत जागा गेल्या आहेत. आता डी. पी. प्लॅनमध्ये पुन्हा हा रस्ता मोठा करण्यात येणार असून १५ मीटर होणार आहे. या बाधितासमोर परत तेच संकट उभे ठाकले आहे. नाममात्र भरपाई देऊन बोळवण केली जात आहे. फेसबुकसारख्या प्रसारमाध्यमावर पीडित लोक आपल्या तीव्र प्रतिक्रिया देत असून मंदिर परिसरातील स्थानिक लोकांमध्ये नैराश्याची भावना निर्माण होत आहे.

