लखनौवर 7 गडी राखून विजय : सामनावीर श्रेयस अय्यरचे नाबाद शतक : लखनौचा पराभवाने शेवट
वृत्तसंस्था/ लखनौ
श्रेयस अय्यरची नाबाद शतक आणि प्रभसिमरनच्या धमाकेदार अर्धशतकाच्या जोरावर पंजाब किंग्सच्या संघाने घरच्या मैदानावर खेळणाऱ्या लखनौ सुपर जाएंट्सला पराभूत करत प्लेऑफ्सच्या आशा कायम ठेवल्या आहेत.
प्रथम फलंदाजी करताना लखनौने 20 षटकात 6 बाद 196 धावा केल्या. या धावांचा पाठलाग पंजाब किंग्सने 7 विकेट्सनी विजय नोंदवला. श्रेयस अय्यरने षटकारासह आयपीएलमधील पहिले शतक झळकावत संघाचा विजय निश्चित केला. आता पंजाबच्या सर्व नजरा मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील लढतीवर असतील. या सामन्यात मुंबई जिंकली तर पंजाबचा संघ चौथ्या स्थानावर प्लेऑफ्ससाठी पात्र ठरू शकतो.
प्रारंभी, लखनौचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. लखनौकडून जोश इंग्लिस आणि अर्शिन कुलकर्णीची जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात आली. अर्शिन कुलकर्णी गोल्डन डकवर माघारी परतला. तर जोश इंग्लिसने 44 चेंडूत 72 धावांची वादळी खेळी केली. त्यानंतर निकोलस पूरन अवघ्या 2 धावांवर माघारी परतला. शेवटी आयुष बदोनीने अवघ्या 18 चेंडूत 43 धावांची खेळी केली. या ऋषभ पंतने 26 धावांचे योगदान दिले. शेवटी अब्दुल समदने 37 धावांची खेळी केली. यासह लखनौ संघाने 20 षटकांअखेर 6 बाद 196 धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात खराब झाली. सलामीवीर प्रियांश आर्याला भोपळाही फोडता आला नाही. कुपर कॉनोलीही 18 धावा करुन माघारी परतला. यानंतर प्रभसिमरन सिंग आणि श्रेयस अय्यरने संघाचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून शतकी भागीदारी केली. प्रभसिमरन सिंगने 39 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारासह 69 धावा केल्या. तर श्रेयसने शतकी खेळी साजरी करताना 51 चेंडूत 11 चौकार आणि 5 षटकारासह नाबाद 101 धावा फटकावल्या. श्रेयसच्या या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर पंजाबने विजयी टार्गेट 18 षटकांतच पूर्ण करत विजयाला गवसणी घातली. सूर्यांश शेडगे 9 धावांवर नाबाद राहिला.
संक्षिप्त धावफलक
लखनौ 20 षटकांत 6 बाद 196 (इंग्लिस 72, अर्शिन कुलकर्णी 0, आयुष बडोनी 43, ऋषभ पंत 26, अब्दुल समाद नाबाद 37, यान्सेन आणि चहल प्रत्येकी 2 बळी, ओमरझाई 1 बळी)
पंजाब किंग्स 18 षटकांत 3 बाद 200 (प्रभसिमरन सिंग 69, कॉनोली 18, श्रेयस अय्यर नाबाद 101, शेडगे नाबाद 9, मोहम्मद शमी 2 बळी, अर्जुन तेंडुलकर 1 बळी).
पंजाब, राजस्थानमध्ये चुरस
आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यात क्वालिफायर 1 चा सामना होणार आहे. हैदराबादविरुद्ध एलिमिनेटरमध्ये कोणता संघ खेळेल, याचा फैसला होणे बाकी आहे. पंजाबने शनिवारी लखनौ सुपर जायंट्सवर विजय मिळवून 14 सामन्यांत 15 गुणांसह चौथे स्थान पटकावले. पण, त्यांना रविवारी होणाऱ्या सामन्यांवर लक्ष ठेवावे लागणार आहे. राजस्थान रॉयल्सचा संघ 14, तर कोलकाता नाइट रायडर्स 13 गुणांसह अजूनही स्पर्धेत आहेत. राजस्थानने मुंबई इंडियन्सविरुद्धची मॅच जिंकल्यास, ते 16 गुणांसह प्ले ऑफमध्ये जातील. पण, त्यांची हार झाल्यास पंजाबसाठी संधी असेल. मात्र, दिल्ली कॅपिटल्सकडून केकेआरची हार त्यांना हवी आहे.

