Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पंजाबमध्ये 'आप'चा मोठा विजय

पंजाबमध्ये 'आप'चा मोठा विजय

नगरपालिका निवडणुकांमध्ये मारली बाजी

वृत्तसंस्था / चंदीगढ

पंजाबमध्ये मागच्या आठवड्यात झालेल्या नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये राज्यात सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्षाचा मोठा विजय झाला आहे.

आतापर्यंत निर्णय झालेल्या साधारणत: 1,750 प्रभागांपैकी या पक्षाने 900 हून अधिक प्रभाग जिंकले आहेत. काँग्रेस पक्ष दुसऱ्या स्थानावर राहिला आहे. त्या पक्षाला 350 हून अधिक जागा मिळाल्या आहेत. भारतीय जनता पक्षाला मात्र अपयश आले असून तो पक्ष पाचव्या स्थानी आहे.

राज्यातील 102 नगरपालिका आणि 8 महानगरपालिका यांच्यात या निवडणुका झाल्या होत्या. त्यांच्या मतगणनेला शुक्रवारी प्रारंभ करण्यात आला होता. प्रारंभापासूनच आम आदमी पक्षाचे उमेदवार पुढे होते. या पक्षाला आठ महानगर पालिकांपैकी 6 महानगरपालिकांमध्ये बहुमत मिळाले आहे. 102 नगरपालिकांपैकी बव्हंशी नगरपालिकांमध्ये हा पक्ष आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस, तसेच अकाली दल आणि भारतीय जनता पक्ष हे सर्य पक्ष बरेच मागे पडले आहेत. या राज्यात पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे या नागरी निवडणुकांना मोठ्या प्रमाणात महत्व प्राप्त झाले आहे.

आज होणार चित्र स्पष्ट

या निवडणुकांच्या परिणामांचे चित्र आज शनिवारी स्पष्ट होणार आहे. आतापर्यंत निम्म्याहून अधिक परिणाम समोर आले आहेत. या परिणामांच्या अनुसार आम आदमी पक्षाने मोठी आघाडी घेतली आहे. अद्याप कोणत्याही महानगरपालिकेचे पूर्ण परिणाम हाती आलेले नाहीत. मात्र, बहुतेक महानगरपालिकांमध्ये आम आदमी पक्ष आघाडीवर असल्याचे दिसत आहे. मागच्या 2021 मध्ये झालेल्या महानगर पालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा दणदणीत विजय झाला होता. त्यावेळी काँग्रेस पक्ष राज्यात सत्तेवर होता. त्यावेळी काँग्रेसने महानगरपालिकांच्या 400 प्रभागांपैकी 317 मध्ये विजय मिळविला होता. तसेच सर्व महानगरपालिकांमध्ये बहुमत मिळविले होते, असे दिसून येत आहे. तसेच, नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांमध्येही तोच पक्ष विजयी ठरला होता. यावेळी आम आदमी पक्षाने त्याला मागे टाकल्याचे दिसून येते. भारतीय जनता पक्षाची स्थिती यावेळीही मागच्या वेळेसारखीच राहिल्याचे स्पष्ट होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat