चीनमधील जियानशिया नामक महिला सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेचा विषय बनली आहे. तिच्या डोळ्यांच्या पापण्यांचे काही केस लांब होऊ लागले आहेत. त्या केसांची लांबी तिच्या डोक्यावरील केसांच्या लांबीपेक्षाही अधिक आहे.
गेल्या सात वर्षांपासून अचानक तिच्या पापण्यांच्या केसांची लांबी वाढू लागली. तिच्या पापण्यांचे काही केस चांगले 8 इंच लांब वाढले आहेत. 2015 पासून तिच्या पापण्यांचे केस लांब होऊ लागले. तिनेही ते न कापता वाढविण्याचे ठरविले. 2016 पर्यंत त्यांची लांबी जवळपास साडेचार इंच झाली. त्यावेळी हा विक्रम तिच्या नावे नेंदविला गेला होता. आता 2026 मध्ये तिच्या पापण्यांच्या काही केसांची लांबी 20.50 सेंटीमीटर, अर्थात आठ इंच झाल्याचे दिसून आलेले आहे.
तिच्या पापण्यांचे केस इतके लांब का वाढतात, याचे कारण अद्याप सापडलेले नाही. तिच्या डॉक्टरांनाही ते समजलेले नाही. तिच्या सर्व शारिरीक तपासण्या आणि चाचण्या झाल्या आहेत. तथापि, तिच्या प्रकृतीत कोणताही मोठा दोष आढळलेला नाही. जियानशियाच्या म्हणण्यानुसार तिच्या पापण्यांच्या केसांची लांबी गेल्या 10 वर्षांपासून वाढत आहे. शरीरातील विशिष्ट जनुकीय रचनेमुळे असे होत असेल, असे अनुमान काही तज्ञांनी व्यक्त केले आहे. तथापि, या कारणासंदर्भातही दुमत आहे. कारण, तिच्या कुटुंबियांपैकी कोणाच्याही पापण्यांचे केस असे लांब नाहीत. ते सर्वसामान्य लांबीचेच आहेत. तिच्या पापण्यांच्या केसांच्या लांबीची काही दिवसांपूर्वी शांघाय येथे अधिकृतरित्या गणना करण्यात आली आहे. संपूर्ण जगात इतक्या लांबीचे पापण्यांचे केस सध्या जिवंत असलेल्या कोणत्याही व्यक्तीचे नसावेत, अशी चर्चा आहे. जियानशिया हिला केवळ या कारणासठी पहावयास येणाऱ्या लोकांची संख्याही मोठी आहे. तिच्या जवळपासच्या साऱ्या लोकांच्या दृष्टीने हा एकाचवेळी कौतुकाचा आणि आश्चर्याचा विषय आहे.

