हे जग अनेक नैसर्गिक आश्चर्यांनी भरलेले आहे. युरोपातील बुल्गारिया देशात असलेले अशा प्रकारचे एक आश्चर्य लोकप्रिय आहे. या देशात काही गुहा अशा आहेत, की ज्यांची आपल्याला कल्पनाही करता येणे अशक्य आहे.
या गुहांना 'परमेश्वराचे नेत्र' असे संबोधले जाते. या गुहांच्या छतावर दोन लंबवर्तुळाकार मोठी छिद्रे आहेत. ही छिद्रे माणसांच्या डोळ्यांसारखीच दिसतात. ती आकाराने बरीच मोठी असल्याने यांना 'परमेश्वराचे नेत्र' मानण्यात येते, असे अनेकांचे मत आहे.
दुपारच्या वेळी सूयाचे किरण या छिद्रांमधून या गुहांमध्ये प्रवेश करतात, तेव्हा या गुहांची खोली आणि भयाणता यांची कल्पना येते. प्रत्येक आकाशच या गुहांमध्ये डोकावून पहात आहे, असा भास लोकांना होतो. या गुहा पाहण्यासाठी प्रत्येक वर्षी लक्षावधी पर्यटक या देशात येतात. या गुहा बुल्गारियाची राजधानी सोफिया या शहरापासून साधारणत: 150 किलोमीटर अंतरावर आहेत. या गुहा चुनखडीपासून बनलेल्या आहेत. या गुहा ज्या प्रदेशात आहेत, तो प्रदेशाच चुनखडीच्या दगडांचा आहे. पाणी आणि वारा यांच्यामुळे या चुनखडीच्या खडकांची झीज होऊन या गुहा बनलेल्या आहेत. ही झीज कोट्यावधी वर्षांपासून होत आली आहे. त्यामुळे या गुहा खूप खोल आणि भीतीदायक वाटतात. त्यांचे शास्त्रीय नाव 'प्रोहोडना केव्ह्ज्' असे आहे. पण त्यांच्या स्वरुपामुळे त्या 'परमेश्वराचे नेत्र' या नावाने परिचित आहेत. या गुहांच्या छतांवर जी दोन लंबवर्तुळाकार छिद्रे आहेत, ती निर्माण होण्यासाठीही सहस्राववधी वर्षे लागली आहेत. पाणी आणि चुनखडी यांच्यातील रासायनिक प्रक्रियेने अतिशय मंदगतीने या छताची विशिष्ट स्थानी झीज झाली आणि त्यामुळे ही दोन छिद्रे निर्माण झाली. या गुहांच्या आत उभे राहून वर पाणी आणि प्रकाश यांचा संगम पाहणे हा एक अत्यंत अद्भूत आणि रोमांचकारी अनुभव असतो. या गुहा नि:शब्द आणि अतिशय खोल असल्याने तेथे येणारा अनुभव वेगळाच असतो, अशी प्रतिक्रिया अनेक पर्यटकांनी व्यक्त करतात.

