Dailyhunt
पश्चिम बंगालात भाजपच्या विजयात सतीश धोंड यांची महत्त्वाची कामगिरी

पश्चिम बंगालात भाजपच्या विजयात सतीश धोंड यांची महत्त्वाची कामगिरी

णजी : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विजयात दिवस-रात्र आपले योगदान देणारे सतीश धोंड यांचे नाव सर्वत्र आता चर्चेत आले असून गोव्याचे महामंत्री म्हणून अनेक वर्षे कार्य केलेले सतीश धोंड यांनी प. बंगालच्या निवडणुकीतदेखील फार मोठी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

या निवडणुकीत सतीश धोंड यांच्याकडे 126 जागांचे उद्दिष्ट होते आणि त्या प्रांतामध्ये जाऊन त्यांनी अनेक पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करायचे. त्यांच्याकडून पक्षाच्या प्रचाराचे काम करून घ्यावयाचे, अशी फार मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती.

धोक्याच्या भागात केले पक्षकार्य

प. बंगालच्या या निवडणुकीमध्ये अनेक भाग असे होते की ज्या ठिकाणी भाजपच्या एका कार्यकर्त्याला देखील जायला बंदी होती. अनेक ठिकाणी जवळजवळ सर्वच गावे मुस्लीमबहुल गावे होती. त्या ठिकाणी भाजपचा कार्यकर्ता दिसला तरी त्याला मारहाण होत असे. अशा भागात जाऊन देखील भाजपचा प्रचार सतीश धोंड यांनी फार कल्पकतेने केला.

गोव्यातून बदली प.बंगालमध्ये

दोन वर्षांपूर्वी गोव्यातून पश्चिम बंगालमध्ये सतीश धोंड यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर पक्षाने त्यांच्याकडे पश्चिम बंगालच्या निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जागृती निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम सोपविले. त्याचबरोबर संघटनात्मकदृष्ट्या पक्ष तळागाळामध्ये मजबूत करण्यासाठी त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी सोपविली होती. सतीश धोंड यांनी ही जबाबदारी स्वीकारली आणि ते प. बंगालमध्येच राहिले. पाच महिन्यांपूर्वी त्यांच्या कन्येचा विवाह गोव्यात झाला. लग्नाच्या दोन दिवस अगोदर ते गोव्यात आले आणि विवाह सोहळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा बंगालमध्ये गेले. त्यानंतर अजून ते गोव्यात पोहोचले नव्हते.

126 पैकी 100 जागांवर यश

भाजपने पश्चिम बंगालमध्ये गेली साडेतीन वर्षे पुढील निवडणुकीसाठी तळागाळात काम सुरू केले होते. सतीश धोंड यांनी फार मोठे आव्हान स्वीकारून गोव्यात जसे काम केले तसेच पश्चिम बंगालमध्ये देखील केले. त्यामुळेच त्यांच्यावर जी 126 मतदारसंघांची जबाबदारी सोपविली होती, त्यातील शंभर मतदारसंघांमध्ये भाजपने विजय प्राप्त केला. एका गोमंतकीय सुपुत्राने पश्चिम बंगालमध्ये जाऊन प्रवाहाविरुद्ध भाजपसाठी फार मोठी जोखीम पत्करली आणि तेवढ्याच तळमळीने काम केले. विजयाचे जे अनेक शिल्पकार होते त्यामध्ये सतीश धोंड यांचाही बराच वरचा क्रमांक आहे.

आता पुन्हा गोव्यात ?

आगामी गोवा विधानसभा निवडणूक साधारणत: डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता वाढली असून या निवडणुकीसाठी सतीश धोंड यांच्याकडे फार मोठी जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अलीकडेच गोव्यात येऊन पाहणी केली. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक, खासदार सदानंद तानावडे या नेत्यांना मार्गदर्शन केले. गोव्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार आणण्यासाठी व्यूह रचना आखणे आणि संघटना अधिक मजबूत करून सूक्ष्म पातळीवर काम करण्यासाठी, सतीश धेंड यांना गोव्यात पाठवण्याची शक्यता आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat