Dailyhunt
पतीने कोंडून घातलेल्या महिलेची सुटका

पतीने कोंडून घातलेल्या महिलेची सुटका

टिळकवाडीतील प्रकार : दिल्लीतील माहेरवासियांकडून तक्रार, आक्का पथकाने दिली धडक

बेळगाव : कौटुंबिक वादातून पतीने कोंडून घातलेल्या महिलेची आक्का पथकाने सुटका केली आहे. त्या महिलेवर वैद्यकीय उपचार करून विमानाने तिला नवी दिल्ली येथील तिच्या माहेरी पाठविण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. शुक्रवार दि. 3 रोजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना नवी दिल्ली येथून एक कॉल आला. जावयाने आमच्या मुलीला घरात कोंडून घातले आहे. तिची सुटका करा, अशी विनवणी दिल्ली येथील माहेरवासियांनी केली. लगेच महिला पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांना वरिष्ठांनी याची माहिती दिली. आक्का पथकालाही सतर्क केले.

कॅम्पच्या पोलीस उपनिरीक्षक ए. रुक्मिणी यांच्यासह आक्का पथकातील आर. आय. कडलगी, स्वप्ना गोंधळी, रुपाश्री यमकनमर्डी, सिद्धाप्पा सांगली आदींनी टिळकवाडी येथील ती महिला रहात असलेले घर गाठले. दरवाजा ठोठावून पतीला बाहेर बोलावण्याचा प्रयत्न झाला. सुरुवातीला त्याने प्रतिसाद दिला नाही. शेवटी दरवाजा फोडण्याच्या तयारीत असतानाच पतीने दरवाजा उघडला. व्यवसायाने जिम ट्रेनर असणाऱ्या या तरुणाने दिल्ली येथील तरुणीशी पाच वर्षांपूर्वी विवाह केला आहे. त्यांना एक मुलगा, एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. कौटुंबिक वादातून त्याने दिवसभर पत्नीला घरात कोंडून तिचा छळ सुरू केला होता.

पत्नीने ही गोष्ट नवी दिल्ली येथील आपल्या माहेरवासियांना सांगितली. त्यानंतर त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तिची सुटका करण्याची विनंती केली. पतीने कोंडून घातलेल्या महिला व मुलांची सुटका करून तिने दिलेल्या फिर्यादीवरून महिला पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करून पतीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्या महिलेच्या सुरक्षिततेचा विचार करून पोलिसांनी विमानाने तिला माहेरी पाठविले. 17 फेब्रुवारीपासून बेळगावात आक्का पथक कार्यरत आहेत. तेव्हापासून आतापर्यंत सुमारे 70 ठिकाणी शाळा-कॉलेज, बसथांबे, रेल्वेस्थानक, विद्यार्थिनी वसतिगृह, वर्किंग वूमन्स हॉस्टेल, पीजी आदी ठिकाणी भेटी देऊन 91 महिला जागृती कार्यक्रम केले आहेत. तसेच दोन महिलांचे रक्षण केले असून कौटुंबिक कलहात त्रासात असलेल्या महिलांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat