Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रेमासाठी युवकाने सोडले आलिशान जीवन

प्रेमासाठी युवकाने सोडले आलिशान जीवन

प्रेमात पडलेला माणूस काहीही करू शकतो असे बोलले जाते, कुणी देश बदलतो, कुणी स्वत:चे करियर सोडून देतो, परंतु अमेरिकेतील एका युवकाने प्रेमासाठी स्वत:चे आरामदायी जीवनच सोडले आहे. त्याने शहराच्या धावपळयुक्त अन् आधुनिक सुविधांना रामराम ठोकला आणि आता पत्नीसोबत अमेझॉनच्या घनदाट जंगलांमध्ये एका आदिवासी समुदायासोबत राहत आहे.

आता त्याचे जीवन पूर्णपणे बदलले आहे.

23 वर्षीय जस्टिन अल्वोची इक्वेडोरमध्ये मारियासोबत भेट झाली होती. मारिया अमेझानॅच्या शुआरो आदिवासी समुदायाची सदस्य आहे आणि ती त्यावेळी एका अमेझॉनियन रेस्टॉरंटमध्ये शेफ म्हणून काम करत होती. मारिया अन् जस्टिन यांच्यात प्रथम मैत्री झाली आणि मग प्रेमात पडले आणि अखेर दोघांनी विवाह केला आहे.

आता हे दांपत्य पूर्व इक्वेडोरमधील अमेझॉन वर्षावनांमध्ये राहते. दोघेही स्वत:चे दैनंदिन जीवन आणि आदिवासी संस्क़ृतीची झलक स्वत:च्या युट्यूब चॅनेलवर दाखवत असतात.

पित्यामुळे अमेझॉनमध्ये पोहोचला

जस्टिन हा अमेरिकेत लहानाचा मोठा झाला आहे, परंतु अमेझॉनशी त्याचे खास नाते देखील आहे. त्याच्या वडिलांचे बालपण इक्वेडोरच्या एका दुर्गम आदिवासी भागात गेले होते. याचमुळे तो तेथे पहिल्यांदा पोहोचला होता. परंतु खरे आदिवासी जीवन जवळून पाहणे माझ्यासाठी एखाद्या दुसऱ्या ग्रहावर पोहोचण्यासारखा अनुभव होता असे जस्टिन सांगतो.

पहिल्यांदा तेथे गेलो तेव्हा माझे अपहरण होईल का अशी मला भीती वाटत होती. आम्ही जंगलाच्या अत्यंत निर्जन भागात भेटणार होतो. प्रारंभी जंगलातील आयुष्याबद्दल मला फारसे माहित नव्हते. कोणती रोपं विषारी आहेत, कोणत्या किड्यांपासून वाचावे आणि कोणता साप जीव घेऊ शकतो हे मला ठाऊक नव्हते. परंतु शुआर समुदायाने हळूहळू मला जंगलात सुरक्षित राहण्याच्या पद्धती शिकविल्या आणि तेथील नियमांची ओळख करून दिल्याचे जस्टिनचे सांगणे आहे.

सापाला स्पर्श

जस्टिनने एकदा समुदायाच्या इशाऱ्यानंतरही एका बोआ सापाला स्पर्श केला होता. शुआर आदिवासी या सापाला अध्यात्मिक रुपात अत्यंत पवित्र मानतात. यानंतर त्याला गरोदर महिलांपासून दूर राहण्यास सांगण्यात आले होते. सापाला स्पर्श केल्यावर त्याच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा शिरल्या आहेत. या नकारात्मक ऊर्जा विशेष धार्मिक प्रक्रियेने दूर करणे आवश्यक आहे, अन्यथा गरोदर महिलांपर्यंत त्या पोहोचू शकतात असे समुदायाचे मानणे होते.

अवयव तस्कर असल्याचा संशय

मारियाच्या परिवारातील अनेक लोकांनी जस्टिनचे खुल्या मनाने स्वागत केले. जस्टिन आदिवासी परंपरा शिकू इच्छितो आणि त्याने सर्वांसाठी भेटवस्तू आणल्याचे पाहून त्यांना चांगले वाटले. परंतु परिवाराच्या काही नातेवाईकांना त्याच्यावर भरवसा नव्हता. जस्टिन अवयवाहंच्या तस्करीशी निगडित इसम तर नाही ना असा संशय त्यांना होता.

पहिल्या भेटीतच प्रेम व्यक्त

मारियाच्या पहिल्या भेटीतच मी तिच्यासमोर प्रेम व्यक्त केले होते. मारियाला मी शुआर समुदायावर माहितीपट अन् व्हिडिओ तयार करू इच्छितो, तू साथ देशील का असे विचारले होते, अन् तिने होकार दर्शविला होता. आम्ही दोघांनी मोबाइल क्रमांकांची देवाणघेवाण केली, परंतु मारियाकडे अत्यंत साधारण मोबाइल होता, त्याद्वारे मेसेज पाठविणेच शक्य होते, तरीही आम्ही बोलत राहिलो नंतर भेटींचे सत्र सुरू झाल्याचे जस्टिनचे सांगणे आहे.

पारंपरिक पेय

जस्टिनसाठी सर्वात मोठा सांस्कृतिक शॉक तेथील पारंपरिक पेय चिचा होते. हे एका मूळापासून तयार होणारे फर्मेंटेड पेय आहे. हे तयार करण्यासाठी महिला प्रथम या मूळाला अनेक मिनिटांपर्यंत चावतात, मग मोठ्या भांड्यात ते थुंकतात, यानंतर सुमारे एक आठवड्यांपर्यंत फर्मेंट होण्यासाठी ठेवले जाते, नंतर हे सौम्य मादक पेयामध्ये रुपांतरित होते. हे कसे प्यावे हेच मला प्रथम कळत नव्हते. तर शुआर समुदायाच्या संस्कृतीत एखाद्या अतिथीने चिचा पिण्यास नकार दिला तर तो यजमानाचा अपमान मानला जातो. याचमुळे मी ते पिले होते. पहिल्यांदा पिल्यावर मला जीवनातील सर्वात भयानक पोटदुखी झाली होती. सुमारे दीड वर्षांपर्यंत सातत्यो प्यायल्यावर आता मला याची सवय झाली आहे. आता मला चिचा अत्यंत पसंत पडत असल्याचे जस्टिनने म्हटले आहे. जस्टिनने एक अनोखा पाळीव प्राणी बाळगला आहे. हा जेवलीना नावाच जंगली पेक्करी आहे, जो दिसण्यास छोट्या डुकरासारखा आहे. हा जगातील सर्वात प्रेमळ प्राणी आहे, परंतु मोठा झाल्यावर त्याचे वजन जवळपास 40 किलोग्रॅम होईल हे मला ठाऊक आहे.

परिवारासोबत जंगलात नवे जीवन

जस्टिन अन् मारिया आता आनंदात स्वत:चे जीवन जगत आहेत. याचवर्षी या जोडप्याने एका अपत्याचे स्वागत केले आहे. शहरातील झगमगाट सोडून जंगलातील आयुष्य अवलंबिणऱ्या या जोडप्याची कहाणी आता सोशलमीडियावरही मोठ्या प्रमाणात पसंत केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat