Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रॅपिड विभागात प्रज्ञानंदची संयुक्त आघाडीसह सांगता

रॅपिड विभागात प्रज्ञानंदची संयुक्त आघाडीसह सांगता

वृत्तसंस्था, झाग्रेब (क्रोएशिया)

ग्रँड चेस टूरच्या क्रोएशिया टप्प्यातील रॅपिड विभागाच्या अखेरच्या दिवशी भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने सलग तीन सामने जिंकले. या कामगिरीमुळे त्याने 12 गुणांसह फ्रान्सच्या फिरौझा अलिरेझाशी संयुक्तपणे पहिले स्थान पटकावले.

दुसऱ्या दिवसानंतर थोडा पिछाडीवर पडलेल्या प्रज्ञानंदने शेवटच्या तीन फेऱ्यांमध्ये आपली सर्वोत्तम खेळी सादर केली. त्याने क्रोएशियाचा इव्हान सारिक, रोमानियाचा डीक बोगदान-डॅनियल आणि नेदरलँड्सचा अनिश गिरी यांचा पराभव करून अखेरीस अलीरेझाशी बरोबरी साधली. रॅपिड विभागातील उत्कृष्ट कामगिरीमुळे फ्रान्सचा मॅक्सिम वॉशियर-लाग्रेव्ह आणि उझबेकिस्तानचा नोदिरबेक अब्दुसत्तारोव्ह हे 11 गुणांसह आघाडीवरील खेळाडूंच्या अगदी जवळ पोहोचले. तर भारताचा वर्ल्ड चॅम्पियन डी. गुकेश आणि जर्मनीचा व्हिन्सेंट केमर प्रत्येकी 10 गुणांसह त्यांच्या मागोमाग आहेत.

ब्लिट्झ विभागातील 18 फेऱ्या अजून बाकी असताना, गिरी आठ गुणांसह आहे. तो डीक आणि नेदरलँड्सच्या जॉर्डन व्हॅन फॉरेस्टपेक्षा एका पूर्ण गुणाने पुढे आहे तर सारिक केवळ दोन गुणांसह तळाच्या स्थानावर आहे. प्रज्ञानंदसाठी, या स्पर्धेत संघर्ष करणाऱ्या सारिकविरुद्धच्या सुरुवातीच्या सामन्यापासूनच गोष्टी अनुकुल होऊ लागल्या. कारो-कान डिफेन्समुळे भारतीय खेळाडूला सुरुवातीपासूनच आक्रमक स्थिती मिळाली. हा विजय मिळवण्यासाठी बराचवेळ लागला असला तरी प्रज्ञानंदचे खेळावर पूर्ण नियंत्रण होते.

दुसऱ्या सामन्यात पेट्रोफ डिफेन्समधून खेळताना प्रज्ञानंदने डीकची बचावात्मक फळी भेदली आणि 15 व्या चालीपर्यंतच सामन्याचा निकाल स्पष्ट झाला होता. रोमानियम खेळाडूने लवकरच आपला एक मोहरा गमावला आणि त्यानंतर तो सावरु शकला नाही. दिवसाच्या शेवटच्या सामन्यात, प्रज्ञानंदने नेहमीच भक्कम मानल्या जाणाऱ्या अनिश गिरीविरुद्ध जबरदस्त खेळ केला. कॅटलान ओपनिंगमधून खेळताना त्याने एक प्यादे जिंकले आणि त्यानंतर उत्कृष्ट रणनीतीक चाली वापरून सामन्याचा प्रभावीपणे शेवट केला. हा सामना अवघ्या 34 चालींमध्ये संपला. गुकेशसाठी मात्र हा दिवस प्रज्ञानंदच्या अगदी उलट ठरला. सर्वात तरुण जागतिक विजेता असूनही त्याला तिन्ही सामने बरोबरीतच सोडवावे लागले. ज्यामुळे तो थोडा पिछाडीवर पडला. अब्दुसत्तारोव्ह, केमर आणि अलीरेझा या सर्वांनी गुकेशविरुद्धचे सामने बरोबरीत सोडवले.

रॅपिड फेरीनंतरची गुणतालिका- 1-2 फिरौझा अलीरेझा (फ्रान्स), आर. प्रज्ञानंद (भारत)-प्रत्येकी 12 गुण, 3-4 : मॅक्सिम वॉशियर-लाग्रेव्ह (फ्रान्स), नोदिरबेक अब्दुसत्तारोव्ह (उझबेकिस्तान)-प्रत्येकी 11 गुण. 5-6 डी. गुकेश (भारत), व्हिन्सेंट केमर (जर्मनी)-प्रत्येकी 10 गुण, 7 : अनिश गिरी (नेदरलँड्स, 8), 9: डियाक बोगदान-डॅनियल (रोमानिया), जॉर्डन व्हॅन फॉरेस्ट (नेदरलँड्स)-प्रत्येकी 7 गुण. 10: इव्हान सारिक (क्रोएशिया, 2).

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat