कंपनी आणि प्रशासनाची मोठी दिरंगाई; १६ तास धोक्याची टांगती तलवार
आंबा: कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर आंबा (ता. शाहूवाडी) येथील शासकीय विश्रामगृहाजवळ काल मध्यरात्री एक भीषण अपघात झाला.
१८ टन एलपीजी (LPG) गॅसने भरलेला टँकर रस्त्याशेजारील ५ फुटांच्या चरीत उलटून झालेल्या अपघातात २३ वर्षीय तरुण चालकाचा जागीच चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. महेश संतोष अनभुले (वय २३, रा. घुमारी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) असे मृत चालकाचे नाव आहे.
चालकाचा धावत्या टँकरखाली चिरडून मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीतील जयगड येथील ‘कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेड’ कंपनीचा टँकर १८ टन गॅस घेऊन मंगळवारी सायंकाळी कोल्हापूरच्या दिशेने निघाला होता. मध्यरात्रीच्या सुमारास आंबा घाट चढून आल्यानंतर शासकीय विश्रामधामासमोरील वळणावर चालक महेश लघुशंकेसाठी टँकर थांबवून खाली उतरला.यावेळी टँकर अचानक उताऱ्याच्या दिशेने पुढे सरकू लागला. टँकर धावत असल्याचे पाहून चालकाने तो थांबवण्यासाठी मागे पळत जाऊन गाडीत चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच वेळी टँकर साईडपट्टीवरून घसरून रस्त्याशेजारील पाच फुटांच्या चरीत पलटी झाला. या प्रक्रियेत चालक महेश टँकरखाली चिरडला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद शाहूवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे.
टँकरमध्ये तब्बल १८ टन एलपीजी गॅस असतानाही, पलटी झाल्यानंतर सुदैवाने कोणतीही गॅस गळती (Gas Leakage) झाली नाही. त्यामुळे आंबा घाटातील आणि महामार्गावरील एक मोठा अनर्थ टळला आहे.
अपघाताची माहिती मिळताच तालुका प्रशासनाने तात्काळ गॅस कंपनीच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधून गॅस सुरक्षितपणे दुसऱ्या टँकरमध्ये स्थलांतरित करणारी यंत्रणा (Rescue Team) पाठवण्याची विनंती केली. मात्र, गॅस कंपनीचे मदत पथक तब्बल १६ तासांनंतर म्हणजेच बुधवारी दुपारी ४ वाजता घटनास्थळी दाखल झाले. कंपनीच्या या बेजबाबदार आणि धीम्या कारभारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
वाहतूक रोखण्यावरून पोलीस-महसूल प्रशासनात संभ्रम
गॅस कंपनीचे जनरल मॅनेजर आशिष दत्त त्रिपाठी यांच्या पथकाने तासाभरात ३ वेगवेगळ्या टँकरमध्ये गॅस भरण्याची यंत्रणा सज्ज केली.
घटनास्थळी महामार्ग वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब पालखे यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि शाहूवाडी पोलिसांचे पथक रात्रीपासूनच तळ ठोकून सुरक्षेची काळजी घेत आहेत.

