यादव यांचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय
वृत्तसंस्था / लखनौ
राजकीय पक्षांना निवडणुका जिंकण्यास साहाय्य करणाऱ्या 'इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटी' किंवा आय-पॅक या कंपनीशी असणारा करार संपविण्यात आला आहे, अशी घोषणा समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केली आहे.
मात्र, हा करार मोडण्याचे कारण आर्थिक असल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
बुधवारी लखनौ येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत यादव यांनी हा निर्णय घोषित केला. आम्ही काही काळापुरता या कंपनीशी करार केला होता. 2027 मध्ये उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची पूर्वसज्जता करण्यासाठी हा करार करण्यात आला होता. तथापि, आता तो संपुष्टात आणण्यात येत आहे. समाजवादी पक्ष सध्या आर्थिक चणचणीत आहे. त्यामुळे खर्च परवडत नसल्याने हा करार मोडण्यात आला. काही महिने या कंपनीने आमच्यासह काम केले. तथापि, समाजवादी पक्षाजवळ पैशाचा स्रोत मर्यादित असल्याने या कंपनीचे साहाय्य यापुढे घेता येणार नाही, अशी स्पष्टोक्ती अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषदेत केली.
नाही राजकारणाशी संबंध
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनेही आय-पॅक या युतीशी विधानसभा निवडणुकीत साहाय्यता करण्याचा करार केला होता. निवडणुकीसंबंधातील प्रत्येक निर्णय ही कंपनी घेत होती आणि तृणमूल काँग्रेस ते निर्णय आचरणात आणत होती. असे असूनही तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्यामुळे अखिलेश यादव यांनी या कंपनीशी केलेला करार मोडला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे. तथापि, ही चर्चा योग्य नाही असे प्रतिपादन अखिलेश यादव यांनी केले. तथापि, अद्यापही राजकीय वर्तुळात या घटनेचा संबंध राजकारणाशीच जोडला जात आहे. आय-पॅक या कंपनीने अनेक राजकीय पक्षांसाठी काम केले आहे.
प्रशांत किशोर संस्थापक
या कंपनीची स्थापना प्रसिद्ध निवडणूक सल्लागार प्रशांत किशोर यांनी केली होती. तेव्हापासून अनेक राजकीय पक्षांनी या कंपनीचे साहाय्य घेतले आहे. मात्र, काही वर्षांपूर्वी प्रशांत किशोर यांनी या कंपनीशी आपले नाते तोडले होते. तेव्हापासून ही कंपनी अन्य मालकांच्या ताब्यात गेली होती. या कंपनीवर पश्चिम बंगालमधील गाजलेल्या कोळसा घोटाळ्याचेही आरोप असून ईडीच्या धाडी कंपनीवर पडल्या आहेत. पश्चिम बंगालची निवडणूक शिगेला पोहचली असताना या कंपनीने आपली कार्ये 11 मे पर्यंत थांबविण्याचा निर्णय घेतला होता. ममता बॅनर्जी यांचे या कंपनीशी घनिष्ट संबंध असल्याची चर्चा आजही केली जाते.

