Dailyhunt
Satara News : भोळेवाडी येथे वीज पडून शेतकऱ्याचा जागीच मृत्यु

Satara News : भोळेवाडी येथे वीज पडून शेतकऱ्याचा जागीच मृत्यु

शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला

उंब्रज : भोळेवाडी तालुका कराड येथे शेतात काम करणाऱ्या ५१ वर्षीय शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडल्याने ते जागीच ठार झाले आहेत तर त्यांची पत्नी किरकोळ जखमी झाली आहे.

सदरची घटना शुक्रवार दिनांक ३ एप्रिल रोजी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. सदर घटनेने भोळेवाडी सह परिसरात शोककळा पसरली आहे.

सतीश नाथा सूर्यवंशी वय ५१, रा. भोळेवाडी तालुका कराड असे वीज पडून ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे तर उषा सतीश सूर्यवंशी असे जखमी पत्नीचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सतीश सूर्यवंशी व त्यांची पत्नी उषा व भावजय हे माळ नावचे शिवारातील शेतात भांगलण करण्यासाठी गेले होते.

दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास अवकाळी पाऊस व वीजेचा कडकडाट होताच सतीश व त्यांची पत्नी उषा हे नजीकच्या लिंबाच्या झाडाखाली निवाऱ्यासाठी आले. सतीश लिंबाच्या झाडाला टेकून उभे राहिले होते तर दोन ते तीन फूटाच्या अंतरावर पत्नी उषा झाडाखाली निवाऱ्यासाठी बसली होती.

तर भावजय नजीकच्या दुसऱ्या झाडाखाली निवाऱ्यासाठी बसली होती. यादरम्यान पावसाबरोबरच वीजेचा कडकडाट होवून नेमकी त्याच झाडावर वीज कोसळली असता झाडाला टेकून उभे राहिलेले सतीश सूर्यवंशी हे जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी वीजेच्या धक्याने किरकोळ जखमी झाल्या.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat