Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Satara News |  मोबाईल सोडून हाती घेतल्या बिया! उडतरेच्या विद्यार्थ्यांचा पराक्रम; साडे सतरा लाख बियांचे संकलन

Satara News | मोबाईल सोडून हाती घेतल्या बिया! उडतरेच्या विद्यार्थ्यांचा पराक्रम; साडे सतरा लाख बियांचे संकलन

डतरेच्या विद्यार्थ्यांचा विक्रम; १७ लाखांहून अधिक बियांचे संकलन

सातारा ( इम्तियाज मुजावर) - उडतरे गावच्या विद्यार्थ्यांनी तब्बल साडे सतरा लाख देशी बियांचे संकलन करून पर्यावरण संवर्धनात मोलाची कामगिरी केली आहे.मोबाईलच्या वाढत्या आकर्षणामुळे मुलांचा निसर्गापासून दूर जाण्याचा काळ सुरू असताना, सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील उडतरे येथील उडतरे बाळासाहेब पवार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मात्र एक अनोखा आणि प्रेरणादायी आदर्श घालून दिला आहे.

या विद्यार्थ्यांनी तब्बल साडे सतरा लाख देशी बियांचे संकलन करून पर्यावरण संवर्धनात मोलाची कामगिरी केली आहे.

यशवंत शिक्षण संस्था संचलित या विद्यालयात कंपोस्ट खत, गांडूळ प्रकल्प, प्लास्टिकमुक्त अभियान आणि विविध वनस्पतींचे संवर्धन असे नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. याच उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग संवर्धनाचे संस्कार रुजले असून, दीपावली आणि उन्हाळी सुट्ट्यांमध्येही हे विद्यार्थी आनंदाने बीज संकलन करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

विद्यालयाचे मुख्याध्यापक दादासाहेब बनसोडे आणि हरित सेनेचे प्रमुख प्रकाश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 341 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत 30 प्रकारच्या वनस्पतींच्या 17 लाख 47 हजार 818 बियांचे संकलन करून विक्रमी कामगिरी केली आहे. या उपक्रमाला पर्यावरणप्रेमी व अभिनेते सयाजी शिंदे यांचेही मार्गदर्शन लाभले आहे.

गेल्या पाच वर्षांपासून सामाजिक वनीकरण विभाग सातारा आणि सामाजिक वनीकरण विभाग वाई यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत संकलित बियांचे वृक्षारोपणासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात आहे. आज विद्यार्थ्यांनी गोळा केलेल्या सर्व बिया अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सामाजिक वनीकरण विभाग वाई यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत, मोबाईलच्या मोहाला दूर ठेवत निसर्गाशी नाळ जपणाऱ्या या विद्यार्थ्यांचे कार्य खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरत असून, भविष्यात हरित महाराष्ट्र घडवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat