साताऱ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांची मोठी कारवाई
सातारा -वाठार स्टेशन पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात मोठी कारवाई करत बिचुकले परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात जणांना ताब्यात घेतले.
या कारवाईत जुगाराचे साहित्य, रोख रक्कम व मोटारसायकलींसह तब्बल ३ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर तसेच कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांनी वाठार पोलीस ठाणे हद्दीत फरार आरोपी, चोरीचे गुन्हे व अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी डी.बी. पथकाला विशेष सूचना देत कारवाईचे आदेश दिले होते.
दि. २७ रोजी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, मौजे बिचुकले (ता. कोरेगाव) येथील पळसवाट शिवारात काही जण पैसे लावून तीन पानी जुगार खेळत आहेत. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी अचानक छापा टाकला. यावेळी सात जणांना जागीच पकडण्यात आले.कारवाईदरम्यान आरोपींकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम तसेच मोटारसायकली असा एकूण ३,४५,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपींमध्ये अर्जुन नारायण पवार (वय ५०), मानसिंग साहेबराव पवार (वय ६१), विनोद हणमंत पवार (वय ४५), शिवाजी नथू शिंदे (वय ७०), अरुण धर्माजी सपकाळ (वय ६५), बाळकृष्ण चंदरराव पवार (वय ४७, सर्व रा. बिचुकले, ता. कोरेगाव) तसेच आण्णा शंकर पवार (वय ४६, रा. गुजरवाडी, ता. कोरेगाव) यांचा समावेश आहे.
सदर कारवाईत पोउनि गहिनीनाथ सातव, पोउनि नितीन भोसले, पोहवा उदय जाधव, जितेंद्र शिंदे, प्रकाश चव्हाण, पोलीस अंमलदार विठ्ठल काळे, प्रतिक देशमुख, तेजस कर्णे, विजय ढाणे तसेच महिला पोलीस कर्मचारी दिपाली गुरव, माधुरी दीक्षित, आशा देशमुख आणि पूजा जगताप यांनी सहभाग घेतला.

