साताऱ्यात राजपथवर काँक्रीट मिक्सरमुळे वाहतूक कोंडी
सातारा - सातारा शहरातील मध्यवर्ती भागातील राजपथ येथे एका व्यावसायिकाने दुकानाचा स्लॅब उभारण्यासाठी रस्त्याच्या कडेला काँक्रीट मिक्सर उभा करून काम सुरू केल्याने बुधवारी सायंकाळी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली.या प्रकारामुळे नागरिकांना तब्बल अर्धा-अर्धा तास वाहतुकीत अडकून पडावे लागल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.सायंकाळच्या वेळेत राजपथ परिसरात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असते.
त्याचवेळी पादचारी, दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळही वाढलेली असते. अशा गर्दीच्या वेळेत रस्त्याच्या कडेला काँक्रीट मिक्सरचा मोठा ट्रक उभा केल्याने वाहतुकीचा वेग पूर्णपणे मंदावला आणि संपूर्ण परिसरात वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली.या प्रकाराबाबत स्थानिक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, अशी कामे रात्री उशिरा किंवा वाहतूक कमी असताना करणे आवश्यक असल्याचे सांगितले. "धनिकांचे काम असल्याने पालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे. सर्वसामान्य नागरिकाने असे कृत्य केले असते तर तात्काळ कारवाई झाली असती," अशी खंतही नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, संबंधित व्यावसायिकावर पोलीस प्रशासन व पालिकेने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

