Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सौदीला एफ-35 लढाऊ विमाने पुरविणार अमेरिका

सौदीला एफ-35 लढाऊ विमाने पुरविणार अमेरिका

2.3 लाख कोटीच्या व्यवहाराला ट्रम्प यांची मंजुरी : तंत्रज्ञान चीनच्या हाती लागण्याची अमेरिकेला भीती

वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदी अरेबियाला 48 एफ-35 लढाऊ विमाने विक्री करण्यास मंजुरी दिली आहे.

या विमानांची किंमत सुमारे 24 अब्ज डॉलर्स म्हणजेच 2.3 लाख कोटी रुपये आहे. परंतु हा करार अंमलात येण्यापूर्वी अमेरिकेच्या संसदेची मंजुरी आवश्यक आहे.

एफ-35 चे संवेदनशील तंत्रज्ञान चीनच्या हाती लागू शकते अशी चिंता याचदरम्यान अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनुसार पेंटागॉनच्या डिफेन्स इंटेलिजेन्स एजेन्सीच्या (डीआयए) एका अहवालात या धोक्याचा उल्लेख करण्यात आला आहे. चीन सौदी अरेबियात हेरगिरी करत किंवा तेथील सैन्यासोबत स्वत:च्या सहकार्याद्वारे एफ-35 चे तंत्रज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करू शकतो असे अहवालात म्हटले गेले आहे.

एफ-35 अमेरिकेचे सर्वात आधुनिक लढाऊ विमान मानले जाते, यात अत्यंत आधुनिक रडार अन् देखरेख प्रणाली बसविण्यात आली आहे. चीनला या प्रणालीशी निगडित माहिती मिळाल्यास तो अमेरिकेच्या सैन्य तंत्रज्ञानाला नुकसान पोहोचवू शकतो अशी भीती गुप्तचर यंत्रणांना आहे. याचमुळे एफ-35 शी निगडित ठिकाणांवर केवळ अमेरिकन आणि सौदी अधिकारी आणि अधिकृत कर्मचाऱ्यांना प्रवेशाची अनुमती मिळावी असे अहवालात म्हटले गेले आहे.

चीनशी सौदीची वाढती मैत्री

सौदी अरेबियाचे चीनसोबत पूर्वीच सैन्य अन् तंत्रज्ञान विषयक संबंध आहेत. सौदी अरेबिया चीनकडून बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची खरेदी करतो. चीन सौदीला क्षेपणास्त्र निर्मिती आणि त्यांचा प्रभावी वापर करण्यासही मदत करतोय. सौदीच्या दूरसंचार आणि इतर क्षेत्रांमध्ये चीनच्या कंपन्या हुआवे आणि झेडटीईच्या उपकरणांचा वापर होतो. या उपकरणांवरुन अमेरिकेच्या यंत्रणांनी प्रश्न उपस्थित पेले आहेत.

युएईसोबतचा करार रोखला

अमेरिकेला अरब देशांना एफ-35 पुरविण्याशी निगडित चिंता यापूर्वीही राहिली आहे. 2020 मध्ये ट्रम्प प्रशासनाने युएईला एफ-35 विकण्यास सहमती दिली होती. त्यावेळी अमेरिकेच्या यंत्रणांनी युएईच्या चीनसोबतच्या वाढत्या सैन्य आणि तंत्रज्ञान संबंधांवरुन चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर एफ-35 विक्रीची प्रक्रिया रोखण्यात आली होती. सौदी अरेबियाला एफ-35 लढाऊ विमान देण्यावरुन इस्रायलने देखील चिंता व्यक्त केली आहे. मध्यपूर्वेतील केवळ इस्रायलकडेच एफ-35 लढाऊ विमाने आहेत. मध्यपूर्वेत इस्रायलची सैन्य आघाडी कायम रहावी असे अमेरिकेचे धोरण राहिले आहे.

पुरवठ्यास अनेक वर्षे लागणार

अमेरिकेच्या विदेश विभागाने जून महिन्यात 48 एफ-35 विमाने आणि एक अतिरिक्त इंजिनच्या विक्रीचा प्रस्ताव काँग्रेसच्या दोन समित्यांसमोर पाठविला होता. एफ-35 लढाऊ विमानाची निर्मिती लॉकहीड मार्टिन ही कंपनी करते. विमानाच्या निर्मितीत आणि त्याच्या पुरवठ्यास अनेक वर्षे लागू शकतात. म्हणजेच ट्रम्प प्रशासनाच्या मंजुरीनंतरही सौदीला ही अत्याधुनिक लढाऊ विमाने त्वरित प्राप्त होणार नाहीत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat