Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सावंतवाडीच्या लेकीची सिंगापूरमध्ये गरुडभरारी; KPMG मध्ये असोसिएट डायरेक्टरपदी बढती

सावंतवाडीच्या लेकीची सिंगापूरमध्ये गरुडभरारी; KPMG मध्ये असोसिएट डायरेक्टरपदी बढती

सावंतवाडी: मूळ सावंतवाडी तालुक्यातील खळणेवाडी, सांगेली येथील आणि सध्या गोव्यातील अस्नोडा येथे वास्तव्यास असलेल्या स्नेहा सावंत भोसले यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

सिंगापूर येथील नामांकित बहुराष्ट्रीय कंपनी KPMG मध्ये त्यांची असोसिएट डायरेक्टरपदी बढती झाली आहे. त्यांच्या या यशामुळे सावंतवाडीसह गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर स्नेहा यांनी ही यशस्वी वाटचाल केली आहे. त्यांच्या व्यावसायिक प्रगतीमुळे परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

स्नेहा यांचे बालपण गोव्यातील अस्नोडा येथे गेले. त्यांनी गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुण्यातून व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात करत त्यांनी पुढील संधींच्या शोधात सिंगापूर गाठले. तेथील आव्हानांना सामोरे जात त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

बालपणी आरोग्यविषयक समस्यांसह अनेक अडचणींचा सामना करावा लागला, तरीही त्यांनी हार न मानता शिक्षण आणि ध्येयावर लक्ष केंद्रित केले. मुलगा-मुलगी असा भेद न करता मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देणारे त्यांचे वडील आणि शिक्षण व स्वावलंबनाचे महत्त्व पटवून देणाऱ्या शिक्षिका असलेल्या आईचे संस्कार त्यांच्या यशामागे महत्त्वाचे ठरले. २०२२ मध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतरही त्यांच्या विचारांना आदर्श मानत स्नेहा यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली.

सिंगापूरमधील वेगळी संस्कृती, नवीन वातावरण आणि व्यावसायिक स्पर्धेला सामोरे जात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. तंत्रज्ञान क्षेत्रातील दहा वर्षांहून अधिक अनुभवाच्या बळावर त्यांनी डेटा, कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स), क्लाउड आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन या क्षेत्रांत विशेष प्रावीण्य मिळविले आहे.

सांगेली येथील खळणेवाडीचे सामाजिक कार्यकर्ते सुहास सावंत यांची स्नेहा या पुतणी आहेत. त्यांच्या यशस्वी वाटचालीत आई आणि काकांचे मार्गदर्शनही महत्त्वाचे ठरले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविल्याबद्दल स्नेहा सावंत भोसले यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat