Dailyhunt
शिवाजी विद्यापीठाकडून सीमाभागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

शिवाजी विद्यापीठाकडून सीमाभागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

पदवी, पदव्युत्तर, एमबीए अभ्यासक्रमांच्या फीमध्ये सवलत

बेळगाव : बेळगावसह सीमाभागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी, या उद्देशाने बुधवारी रेल्वे ओव्हरब्रिजजवळील संत तुकाराम हॉलमध्ये शिवाजी विद्यापीठाच्यावतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेमध्ये शिवाजी विद्यापीठाच्यावतीने चालविल्या जाणाऱ्या अनुदानित तसेच विनाअनुदानित अभ्यासक्रमांविषयी माहिती देऊन कोणत्या अभ्यासक्रमांना सीमाभागातील विद्यार्थ्यांना सवलत आहे, याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.

शिवाजी विद्यापीठाचे प्रा. डॉ. सुभाष कोंबडे, डॉ. कविता वड्राळे, डॉ. हर्षवर्धन पंडित यांच्यासह इतर प्राध्यापक उपस्थित होते. सीमाभागातील विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठात प्रवेश घेतल्यास एकूण शुल्कापैकी शैक्षणिक शुल्क व वसतिगृह शुल्क माफ करण्यात येणार आहे. उर्वरित फी विद्यापीठ नियमानुसार लागू राहणार आहे. तसेच विनाअनुदानित अभ्यासक्रमांना प्रवेश घेतल्यास फीमध्ये 25 टक्के सवलत मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

महाराष्ट्र सरकारने दावा केलेल्या 865 गावांतीलच विद्यार्थ्यांना ही सवलत मिळणार आहे. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एकूण प्रवेश क्षमतेच्या 10 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये एम.ए., बीजेसी, एम.कॉम., एम.एस्सी., एमबीए यासह इतर अभ्यासक्रमांचा समावेश आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन महाराष्ट्र सरकारच्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

केवळ पदवीच नाही तर बी.टेक, एम.टेक, बी.एस्सी., एम.एस्सी. यासह इतर अभ्यासक्रमांनाही ही योजना लागू केली आहे. ज्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा आहे, त्या अभ्यासक्रमांसाठी 3 मेपर्यंत अर्ज करता येणार आहे. ज्या अभ्यासक्रमांना प्रवेश परीक्षा नाही, त्यांच्यासाठी 31 मेपर्यंत अर्ज करता येणार आहे. 12 ते 15 मे दरम्यान अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी डॉ. सुभाष कोंबडे (मो. 9822881565) किंवा डॉ. कविता वड्राळे (मो. 8408099613) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

कार्यक्रमाला मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, शिवराज पाटील, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, दत्ता उघाडे, महेश जुवेकर, सूरज कुडूचकर, श्रीकांत कदम, संतोष कृष्णाचे, तुकेश पाटील, विजय जाधव यांच्यासह म. ए. समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat