Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
श्री महालक्ष्मी देवीची जल्लोषात मिरवणूक

श्री महालक्ष्मी देवीची जल्लोषात मिरवणूक

थावर आरुढ देवीकडून मानपानाचा स्वीकार : सायंकाळी भंडाऱ्याच्या उधळणीत गदगेवर विराजमान

वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक

'श्री महालक्ष्मी देवी माता की जय, श्री लक्ष्मी देवीच्या नावानं चांगभलं'च्या जयघोषात बुधवारी सायंकाळी 6.30 वाजता लक्ष्मीदेवी चव्हाट गल्लीतील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरच्या बाजूच्या जागेवर उभारण्यात आलेल्या तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये विधिवतपणे गदगेवर आरुढ झाली.

यावेळी एक लाखाहून अधिक जनसागर लोटला होता. कंग्राळी बुद्रुक गावचे ग्रामदैवत श्री लक्ष्मीदेवीच्या यात्रेला मंगळवार दि. 28 पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. मंगळवारी दिवसभर व रात्री 10 पर्यंत भाविकांनी श्री लक्ष्मीदेवीचे मनोभावे दर्शन घेतले. रात्री श्री लक्ष्मीदेवी मंदिरासमोरील मंडपामध्ये देवी स्थानापन्न झाली होती. त्यावेळी भजन, कीर्तन व जागर भजन आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.

 व्हन्नाट कार्यक्रमानंतर श्री लक्ष्मीदेवी रथावर आरुढ

बुधवार दि. 29 रोजी सकाळी 11 वाजता श्री लक्ष्मी देवीचा नवरा (रांडगा) यांच्याकडून विविध धार्मिक विधी पार पडल्यानंतर गावच्या सुख समृद्धी व कुटूंब समृद्धीसाठी गाऱ्हाणे घालण्यात आले. यानंतर श्री लक्ष्मीदेवीचा रेडा व पालवा यांना सजवून हरिजन बंधूंकडून हरिजन वाड्यापासून ढोल-ताशांच्या गजरात व भंडाऱ्याच्या उधळणीत श्री लक्ष्मी मंदिराकडे विधिपूर्वक आणण्यात आले.

यानंतर श्री कलमेश्वर मंदिराचे पुजारी विवेक पुजारी व श्री लक्ष्मीदेवी मंदिराचे पुजारी मोनाप्पा सुतार यांच्या हस्ते देवीचे पूजन करून देवीला व्हन्नाट कार्यक्रमासाठी व रथामध्ये स्थानापन्न करण्यात आले. यावेळी देवीच्या व्हन्नाट धार्मिक कार्यक्रमाला जल्लोषात सुरुवात झाली. देवी अनेक भाविकांच्या खाद्यांवर आरूढ होऊन व्हन्नाट कार्यक्रमाचा आनंद घेत आहे, अशा प्रतिक्रिया यावेळी नागरिकांकडून ऐकावयास मिळत होत्या.

यावेळी देवीचे पुजारी मोनाप्पा सुतार यांच्या घरी जावून देवीने अहेरचा मानपान विधी झाला. यानंतर देवघर घराण्याकडूनही देवीला आपल्या अहेरचा मानपान करण्यात आला. त्यानंतर व्हन्नाट कार्यक्रमाबरोबर देवी रथावर आरुढ झाली. यावेळी देवीचे नयनरम्य रूप भाविक न्याहाळून तृप्त होत होते.

भव्यदिव्य रथावर आरुढ,लोटला भाविकांचा जनसागर

श्री महालक्ष्मी देवी भव्यदिव्य रथावर आरुढ झाल्यानंतर अलोट जनसागराच्या साक्षीने रथ ओढणी कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक रथ ओढणे कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसून आले. रथाचा मार्ग श्री लक्ष्मीदेवी मंदिरापासून गावच्या मध्य चौक व पुढे श्री कलमेश्वर गल्लीत होता. येथे बाळतगावडे घराण्याचा अहेर स्वीकारून देवीचा रथ पुन्हा चव्हाट चौक येथे अर्धा तास विधिवत पूजन करून झाल्यावर रथ ओढणी कार्यक्रमाला पुन्हा सुरुवात करण्यात आली.

भंडाऱ्याच्या अमाप उधळणीत रथोत्सव

देवीचा रथ ओढणे कार्यक्रमप्रसंगी भाविकांची उत्कंठा शिगेला पोहोचल्याचे दृश्य दिसून येत होते. यावेळी भंडाऱ्याची अमाप उधळण करत रथ ओढणीतील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अशा वातावरणामध्ये सायंकाळी 6 वाजता श्री लक्ष्मी देवी गदगेवर स्थानापन्न होण्यासाठी रथातून उतरून व्हन्नाट कार्यक्रमाला सुरुवात केली. थोडा वेळ व्हन्नाट कार्यक्रमानंतर देवी गदगेवर विराजमान झाली.

सुबक रथाचे कारागीर-मान्यवरांचा सत्कार

या कार्यक्रमाचे औचित्य साधून अंकलगी गावचे सुपूत्र व सुबक रथ बनविणारे प्रसिद्ध कारागीर लक्ष्मण बडीगेर, रथाचे आकर्षक रंगकाम केलेले कंग्राळी बुद्रुकचे मेस्त्राr अनिल कडोलकर, देवीचा रथ ओढण्यासाठी देणगीदाखल दोरखंड दिलेले शंकर मेदार यांचा सपत्निक यात्रा कमिटीच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच रथाला दोरखंड बांधण्याचे काम केलेले शेतकरी सेवा संघटनेचे शेतकरी तसेच रथ बनविण्यासाठीचे लोखंड, नटबोल्ट व इतर फॅब्रिकेशनचे काम देणगीदाखल देऊन सहकार्य केलेले उद्योगपती टोपाण्णा पाटील, मारुती पाटील, दयानंद पाटील, युवराज पाटील आदी मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यात्रोत्सवासाठी विविध माध्यमातून सहकार्य केलेल्या कारागिरांचा व इतर मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat