Dailyhunt
सीमाप्रश्नासाठी तन मन धन अर्पूण काम करणार

सीमाप्रश्नासाठी तन मन धन अर्पूण काम करणार

येळळूर विभाग म. ए. समितीमार्फत नूतन अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा सत्कार

येळळूर : सीमाप्रश्नासाठी नेहमीच अग्रेसर असणाऱ्या क्रांतिकारी येळ्ळूर गावाकडून सत्कार होताना फार मोठी जबाबदारी माझ्यावर पडली आहे.

याची जाणीव ठेवत सीमाप्रश्नासाठी तन मन धन अर्पूण काम करणार आहे. आमच्या या पिढीकडून सीमाप्रश्नाची सोडवणूक झाली नाही तर हा प्रश्न सुटणे फारच कठीण आहे, असे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नूतन अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी सत्काराला उतर देताना चांगळेश्वरी मंदिर येळळूर येथे झालेल्या कार्यक्रमात सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येळळूर विभाग म. ए. समितीचे अध्यक्ष विलास घाडी होते.

व्यासपिठावर श्रीराम सेना हिंदुस्थानचे रमाकांत कोंडुसकर, ता. पं. माजी सदस्य रावजी पाटील, येळळूर विभाग समितीचे माजी अध्यक्ष शांताराम कुगजी, कार्याध्यक्ष भुजंग पाटील उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, सीमाप्रश्नासाठी रक्त सांडलेल्या हुतात्म्यांचे स्वप्न त्यांनी या प्रश्नासाठी केलेला त्याग समजून घ्या. सीमाभागातील घराघरातील कार्यकर्त्यांनी 70 वर्षे केलेले कष्ट आणि भोगलेल्या यातनांची आठवण ठेवा. मराठी भाषा टिकली पाहिजे आणि आपली संस्कृती जगली पाहिजे, यासाठी राष्ट्रीय पक्षांच्या ओंजळीने पाणी पिऊ नका. आत्मसन्मानाने जगा. आज आलेल्यांना सोबत घेऊन राहिलेल्यांना मागे सोडून काम करूया. आणि या प्रश्नाची तड लावुया, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी रमाकांत कोंडुसकर, प्रमोद पाटील, भुजंग पाटील यांनी आपल्या मनोगतातून आज समितीला एक उमदे नेतृत्व लाभले असून सीमाप्रश्नासाठी झपाटून काम करणारा कार्यकर्ता अध्यक्ष म्हणून लाभला आहे. मराठी भाषा मराठी संस्कृती यासाठी त्याचे कार्य प्रेरणादायी असून या प्रश्नासाठी एक आशेचा किरण निर्माण झाला असल्याची भावना यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाची सुरुवात श्री चांगळेश्वरी देवीचे पूजन करून झाली. प्रास्ताविक व स्वागत माजी सरपंच सतिश पाटील यांनी तर सूत्रसंचालन बबन कानशिडे यांनी व आभार रामदास धुळजी यांनी मानले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat