Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
स्नेहसंमेलनामध्ये अश्लील गीतांवरील नृत्यांना बंदी

स्नेहसंमेलनामध्ये अश्लील गीतांवरील नृत्यांना बंदी

शिक्षण खात्याचा निर्णय स्वागतार्ह : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर होणार कारवाई

बेळगाव : शाळांच्या स्नेहसंमेलनामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम अपरिहार्य असतात. मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी स्नेहसंमेलन आवश्यक आहे.

मात्र या संमेलनाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थी ज्या गाण्यांचे त्यांना अर्थही माहीत नाही, अशा गाण्यांवर नृत्य करतात. ही बाब खेदजनकच आहे. नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन राज्याच्या शालेय शिक्षण व साक्षरता खात्याने कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमात व स्नेहसंमेलनांमध्ये अशा प्रकारच्या नृत्यांना बंदी घातली आहे. यासंबंधी शिक्षण खात्याच्या संचालकांनी राज्यातील सर्व खासगी आणि सरकारी शाळांना तशा सूचना केल्या असून विद्यार्थी अश्लील गाण्यावर नृत्य करणार नाही याकडे काटेकोरपणे लक्ष द्या, असे स्पष्ट केले आहे. ज्या शाळांमध्ये हा नियम पाळला जाणार नाही, त्या शाळांवर व शाळेच्या व्यवस्थापन मंडळांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

अलिकडच्या काळामध्ये शालेय स्नेहसंमेलनांमध्ये 'चोली की पिछे क्या है, चुपडी चमेली, शिटी वाजली…' अशा द्व्यार्थी गीतांवर नृत्य सादर केले जात होते. वास्तविक पालकांनासुद्धा ही बाब पसंत नव्हती. परंतु थिरकण्याच्या नादामध्ये आपण कोणते गाणे गात आहोत याचे भान ना मुलांना असते, ना शिक्षक तेवढा विचार करतात. त्यामुळे शिक्षण खात्याने आता हा निर्णय घेतला आहे. याबाबत प्राथमिक शालेय शिक्षण संचालकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ज्या गीतातून देशभावना व्यक्त होईल किंवा इतरांना प्रेरणा मिळेल, किंवा जी गीते सकारात्मकता व्यक्त करतात अशाच गीतांना स्नेहसंमेलनामध्ये प्राधान्य द्यावे, शिवाय मुख्याध्यापकांनी गीतांची निवड करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

बहुतांशी स्नेहसंमेलनामध्ये ज्या गाण्याचा अर्थ मोठ्यांनाच समजेल किंवा त्यातून द्व्यार्थी संदेश प्रतिथ होईल अशी गाणी लावण्याचे प्रमाण वाढत आहे. मद्यपान, धूम्रपान यावरसुद्धा गीते असून त्या गाण्यांवरसुद्धा विद्यार्थ्यांनी नृत्य केली आहेत. ही बाब लक्षात घेऊन आता शिक्षण खात्याने हा निर्णय घेतला आहे. ही चूक विद्यार्थ्यांची नाही. खरे तर गाणे निवडून देणे ही शिक्षकांची जबाबदारी आहे. वेषभूषा निवडताना शिक्षकांनी हस्तक्षेप करून अश्लीलतेचे प्रदर्शन होणार नाही असे पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. काही शाळा ही बाब गांभीर्याने घेत असून चित्रपटगीतांना त्यांनी बंदी घातली आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी पक्षी, प्राणी अशा त्यांच्या आवडीच्या विषयातील गीतांवर नृत्य करण्यास प्राधान्य द्यावे, असे मत व्यक्त होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat