सामान्य नागापेक्षा वेगळ्या रंगछटांचा हा विषारी साप
सोलापूर : बाळे (तोडकर वस्ती) परिसरात प्रथमच दुर्मिळ प्रकारातील 'ल्युसिस्टिक नाग' आढळून आल्याने वन्यजीव प्रेमी आणि सर्पतज्ज्ञांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
सामान्य नागापेक्षा वेगळ्या रंगछटांचा हा विषारी साप शनिवारी मध्यरात्री सापडला. सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे त्याची सुरक्षित सुटका करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, (दि. १६) मे रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास बाळे येथील दत्तात्रय चव्हाण आणि राम गायकवाड यांनी त्यांच्या वॉल कंपाऊंडमध्ये सायकलजवळ साप असल्याचे पाहिले. त्यांनी तात्काळ वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन असोसिएशन सदस्य सुरेश क्षीरसागर यांना माहिती दिली.
क्षीरसागर घटनास्थळी पोहोचल्यानंतर सुरुवातीला तो सामान्य नाग असल्याचे वाटले; मात्र जवळून निरीक्षण करताना सापाच्या डोक्यावर व मानेभोवती पांढऱ्या रंगाचे ठिपके दिसून आले. साधारण पावणे पाच फूट लांबीच्या या नागाला कोणतीही जखम नसल्याचेही स्पष्ट झाले. निरीक्षणानंतर हा नाग 'ल्युसिस्टिक' प्रकारातील असल्याचे निष्पन्न झाले.
पुढील वैद्यकीय तपासणीसाठी या सापाला अॅनिमल राहतचे डॉ. आकाश जाधव यांच्याकडे नेण्यात आले.या बचाव मोहिमेत उपवनसंरक्षक कुलराज सिंग, सहायक वनसंरक्षक अजित शिंदे, ऐश्वर्या शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी रोहितकुमार गांगर्डे, शिला बडे, वनपाल रुकेश कांबळे, वनरक्षक गंगाधर विभूते, तसेच रेस्क्यू टीममधील प्रविण जेऊरे, मुन्ना निरवने, प्रसाद बोलदे, वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन असोसिएशन टीमचे शिवानंद हिरेमठ, राहुल दोरकर आदी सहभागी होते.

