Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Solapur News | मनपाकडून बेकायदेशीर बांधकाम विरोधात पाडकाम मोहीम

Solapur News | मनपाकडून बेकायदेशीर बांधकाम विरोधात पाडकाम मोहीम

बहुमजली इमारतीचे पाडकाम महापालिकेने मंगळवारी सुरू केले

सोलापूर : बोगस बांधकाम परवाने घेऊन उभारण्यात आलेल्या बहुमजली इमारतीचे पाडकाम महापालिकेच्या पथकाने मंगळवारी सुरू केले. पाडकाम करण्यासाठी पालिकेचे पथक जेलरोड, पाच्छापेठ परिसरातील इमारतीच्या ठिकाणी गेले.

दरम्यान कारवाईस नागरिकांनी कडाडून विरोध केला.

मात्र नंतर पालिकेच्या पथकाने नागरिकांच्या विरोधास न जुमानता या इमारतीवर जेसीबीने तोडकाम करण्याची कारवाई सुरू केली. यावेळी पालिकेचे अधिकारी व पोलिसांचा फौजफाटा उपस्थित होता.महापालिकेच्या चार अधिकाऱ्यांकडून बनावट परवाने घेऊन उभारलेल्या बेकायदेशीर इमारतींचे पाडकाम मंगळवार, १९ मे पासून करण्याचे आदेश आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी दिले होते.

त्यानुसार मंगळवारी विशेष पोलीस बंदोबस्तात न्यू पाच्छा पेठेतील स्क्वेअर वन बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची आठ मजली इमारत, मुमताज बेगम व इब्राहिम बेगम यांच्या सात मजली इमारतीतील बेकायदा बांधकाम महापालिकेकडून पाडण्यात आले. महापालिकेत एकूण ९६ बनावट बांधकाम परवाने उघडकीस आले होते.

आयुक्तांनी या इमारतीच्या पाडकामाचे आदेश दिल्यानंतर यातील ३५ जणांनी कारवाई थांबविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे पालिका आयुक्तांनी १९ ते २३ मे असे सलग पाच दिवस एकूण नऊ इमारतींचे पाडकाम करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानंतर पुढच्या टप्प्यात इतर इमारतींचे पाडकाम होईल. बांधकाम परवाना विभागाचे कार्यकारी अभियंता नीलकंठ मठपती यांनी जेलरोड पोलिसांना विशेष बंदोबस्त मागणारे पत्र दिले होते. त्यानुसार या पाडकाम मोहिमेप्रसंगी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
नगर अभियंता आणि नगररचना कार्यालयाकडून ब्रेकर आणि पोकलेन मागविण्यात आले होते.या कारवाईसाठी नगररचना विभागाचे उपसंचालक विनय झगडे यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. कारवाईच्या नियोजनासाठी सहसंचालक नगररचना समीर शितोळे, कार्यकारी अभियंता नीलकंठ मठपती यांच्यासह एकूण १२ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाच दिवस ही कारवाई चालणार आहे. यासाठी रॅपिड ॲक्शन फोर्स मागविण्यात आला आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat