Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Solapur Trains News : हुतात्मा एक्स्प्रेसचे 'टाईमटेबल ट्रॅक'वरून घसरले!

Solapur Trains News : हुतात्मा एक्स्प्रेसचे 'टाईमटेबल ट्रॅक'वरून घसरले!

मे महिन्यातील लग्नसराई, उन्हाळी सुट्ट्या आणि पर्यटन हंगामामुळे रेल्वे प्रवाशांची संख्या वाढली

सोलापूर : दौंड-मनमाड रेल्वे मार्गावरील दुहेरीकरणासाठी अकोळनेर-अहिल्यानगर-निंभळक दरम्यान घेण्यात आलेल्या मेगाब्लॉक आणि नॉन-इंटरलॉकिंग कामांचा फटका सोलापूर-पुणे रेल्वे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.

१५ ते १८ मे दरम्यानची कामे पूर्ण झाली असली तरी रेल्वेचे वेळापत्रक अद्याप रुळावर आलेले नाही.

विशेषतः सोलापूर-पुणे आणि पुणे-सोलापूर धावणारी हुतात्मा एक्स्प्रेसचे गेल्या तीन दिवसांपासून वेळापत्रक कोलमडले आहे तर सोमवारी सकाळी निघालेली गाडी तब्बल तीन तास उशिराने पुण्यात पोहोचल्याने प्रवाशांचा संताप वाढला आहे.

मे महिन्यातील लग्नसराई, उन्हाळी सुट्ट्या आणि पर्यटन हंगामामुळे रेल्वे प्रवाशांची संख्या वाढलेली असताना गाड्यांच्या उशिरामुळे नागरिकांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले. काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आल्यानेही प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.

ब्लॉकचा कालावधी संपला असला तरी रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी आणखी एक-दोन दिवस लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रवाशांकडून ‘मंगळवारपासून तरी हुतात्मा एक्स्प्रेस वेळेवर धावणार का?’ असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शनिवार आणि रविवारी घेतलेल्या ब्लॉकमुळे अमरावतीहून पुण्याकडे येणाऱ्या हुतात्मा एक्स्प्रेसचा रेक उशिराने पोहोचला. त्यामुळे रविवारी सायंकाळी पुणे येथून ५.५० वाजता सुटणारी गाडी तब्बल साडेदहा वाजता सोलापूरकडे रवाना झाली. ही गाडी रात्री साडेनऊपर्यंत सोलापूरला पोहोचणे अपेक्षित होते; मात्र ती रात्री २ वाजून ३९ मिनिटांनी सोलापूरात दाखल झाली.

सोमवारी सकाळी ६.३० वाजता सोलापूरहून सुटणारी हुतात्मा एक्स्प्रेस तब्बल साडेतीन तास उशिराने, म्हणजेच सकाळी ९.५८ वाजता रवाना झाली. पुण्यात सकाळी १०.३० वाजता पोहोचणारी ही गाडी दुपारी १.५२ वाजता पुण्यात दाखल झाली. परिणामी प्रवाशांचे पुढील नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat