या पृथ्वीवर लक्षावधी गावे आहेत, हे आपणा सर्वांना माहिती आहे. या गावांमधील एक गाव अंतराळाच्या किंवा सूर्याच्या सर्वात जवळ आहे. सर्वात जवळ याचा अर्थ पृथ्वीवरील इतर कोणत्याही गावापेक्षा या गावाचे सूर्यापासूनचे अंतर सर्वात कमी आहे.
हिमालयातील एव्हरेस्ट हे शिखर पृथ्वीवरील सर्वात उंच पर्वतशिखर आहे, अशी सर्वांची समजूत आहे. तथापि, पृथ्वीवरील एक पर्वत असा आहे की, ज्याचे शिखर पृथ्वीच्या गर्भमध्यापासून अंतराची गणना केली असता सूर्याच्या सर्वात जवळचे आहे. हा पर्वत दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोर या देशात असून त्याचे नाव माऊंट चिम्बोराजो असे आहे. या पर्वतावर अनेक गावे वसलेली आहेत.
ती पुरातन काळापासून या पर्वतावर आहेत. या चिम्बोराजो पर्वताचे शिखर समुद्रतळापासून 6 हजार 228 मीटर उंचीवर आहे. तसे पाहिल्यास समुद्रतळापासून एव्हरेस्ट शिखराचे अंतर 8 हजार 884 मीटर आहे. तथापि, चिम्बोराजो पर्वतावरील हे विशिष्ट गाव विषुववृत्तावर आहे. त्यामुळे समुद्रतळापासून ते एव्हरेस्ट शिखरापासूनही अंतराळाच्या किंवा सूर्याच्या सर्वात जवळचे आहे. कारण पृथ्वी विषुववृत्तावर अधिक फुगलेली आहे. त्यामुळे हे गाव अंतराळापासून किंवा सूर्यापासून पृथ्वीवरचे सर्वात नजीकचे स्थान आहे. हे गाव चिम्बोराजो पर्वताच्या अगदी शिखरावर वसलेले नाही. कारण, हे शिखर वर्षभर हिमाच्छादित असते. तसेच, ते उंच असल्याने तेथे प्राणवायूचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने तेथे मानववस्ती असू शकत नाही. त्यामुळे हे गाव आणि त्यासारखी इतर गावे, या शिखरापासून खालच्या थोट्या सपाट भागावर वसलेली आहेत. या गावात केशुआ आणि पुरुहा नामक वनवासी जमातींचे वास्तव्य सहस्रावधी वर्षांपासून आहे. येथील वायुआवरण विरळ असूनही सहस्रावधी वर्षांच्या वास्तव्याने येथील लोकांनी स्वत:ला येथील वातावरणाच्या दृष्टीने अनुकूल करुन घेतले आहे. येथे नेहमी प्रचंड थंडी असते. त्यामुळे मातीची घरे आणि उष्ण अन्न हेच जीवनाचे मोठे आधार आहेत.

