Dailyhunt
स्वामी विवेकानंद कॉलनीतील गटारींची स्वच्छता, मात्र कचरा तसाच

स्वामी विवेकानंद कॉलनीतील गटारींची स्वच्छता, मात्र कचरा तसाच

लवकरात लवकर कचरा उचलची मागणी

बेळगाव : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून शहर परिसरातील नाले व गटारींची सफाई हाती घेण्यात आली आहे. मात्र, गटारीतून काढण्यात आलेला कचरा तसाच पडून आहे.

त्याची उचल करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अलीकडेच स्वामी विवेकानंद कॉलनी, टिळकवाडी येथील गटारींची स्वच्छता केली आहे. पण काही दिवसांपासून कचरा गटारीच्या बाजूलाच पडून आहे.

दरवर्षी मार्च व एप्रिल महिन्यात नाले व गटारींची सफाई करणे आवश्यक आहे. कारण अवकाळी पावसामुळे मोठी समस्या निर्माण होत आहे. गटारीत प्लास्टिक व केरकचरा तुंबून रहात असल्याने सांडपाणी तसेच पावसाचे पाणी वाहून जाताना अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी पाणी रस्त्यावरून वाहत जाऊन घरे व दुकानांमध्ये शिरत आहे. दरवर्षीची ही समस्या असली तरीही त्याकडे मनपाकडून गांभीर्याने पाहिले जात नाही.

अलीकडेच झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी दैना उडाली. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या मनपाकडून गटारी व नालेसफाईचे काम हाती घेतले आहे. गटारी व नाल्यातून काढलेला कचरा तेथेच टाकण्यात येत आहे. पण त्याची उचल करण्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात आहे. स्वामी विवेकानंद कॉलनी, टिळकवाडी येथील गटारींच्या स्वच्छतेकडे मनपाने दुर्लक्ष केले होते.

त्यामुळे सांडपाणी तुंबून परिसरात दुर्गंधी पसरण्यासह डासांची पैदास वाढली होती. स्थानिक नागरिकांनी वारंवार महापालिकेशी संपर्क साधून तक्रारी केल्या होत्या. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. नगरसेवक आनंद चव्हाण यांनी सांगितल्यानंतर गटारीतील केरकचरा काढण्यात आला आहे. सदर कचरा गटारीच्या बाजूलाच ठिकठिकाणी ठेवण्यात आला असून त्याची उचल करण्यात आलेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर सदर कचऱ्याची उचल करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशातून केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat