Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
थायलंड, सिंगापूरच्या पंतप्रधानांशी मोदींची चर्चा

थायलंड, सिंगापूरच्या पंतप्रधानांशी मोदींची चर्चा

फिलिपाईन्सच्या दौऱ्यात विविध राजनैतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग

वृत्तसंस्था/ मनिला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मनिला येथे थायलंडचे पंतप्रधान अनुतिन चरणविराकुल आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्यासोबत द्विपक्षीय बैठका केल्या.

सिंगापूरच्या पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत गुंतवणूक, पायाभूत सुविधा, नवोपक्रम, सेमीकंडक्टर आणि प्रगत उत्पादन या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. थायलंडच्या पंतप्रधानांसोबतच्या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सुरक्षा, कनेक्टिव्हिटी, डिजिटल तंत्रज्ञान, संस्कृती आणि पर्यटन यांसारख्या मुद्यांवर चर्चा झाली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री हे देखील भारतीय शिष्टमंडळाचा भाग होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिलिपिन्स दौऱ्यादरम्यान राजधानी मनिला येथे विविध राजनैतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला. 23 व्या आसियान-भारत शिखर परिषदेत आणि 21 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत सहभागी होण्याच्या निमित्ताने ते सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. त्यांच्या भेटीत भारत-आग्नेय आशियाई संबंधांवर, तसेच इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सामरिक परिस्थितीवर चर्चा झाली.

पंतप्रधानांच्या दौऱ्याचे प्रमुख आकर्षण 2024 नंतरची पहिली क्वाड शिखर परिषद हेच होते. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जपानच्या पंतप्रधान सनाए ताकाइची आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट घेतली. या नेत्यांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सहकार्य आणि क्वाडच्या भविष्यातील धोरणावर चर्चा केली. याव्यतिरिक्त, पंतप्रधान मोदींनी मनिला येथील एका गुरुद्वाराच्या पायाभरणी समारंभातही भाग घेतला.

सिंगापूरच्या पंतप्रधानांशी चर्चा थायलंडच्या पंतप्रधानांशी भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनिला येथे आसियान-संबंधित बैठकांदरम्यान थायलंडचे पंतप्रधान अनुतिन चरणविराकुल यांची भेट घेतली. पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्याबद्दल मोदींनी त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. बैठकीदरम्यान, दोन्ही नेत्यांनी व्यापार, संरक्षण आणि सुरक्षा, संपर्क व्यवस्था आणि संस्कृती यांसारख्या क्षेत्रांचा समावेश असलेल्या भारत-थायलंड सामरिक भागीदारीला अधिक मजबूत करण्यावर चर्चा केली. भारत आणि थायलंड हे सागरी शेजारी देश आहेत आणि दोन्ही देशांमध्ये शतकानुशतके जुने ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संबंध आहेत.

सिंगापूरच्या पंतप्रधानांना पाठिंबा जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसियान-भारत आणि पूर्व आशिया शिखर परिषदेच्या निमित्ताने सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी भारत आणि सिंगापूर यांच्यातील सर्वसमावेशक सामरिक भागीदारीचा आढावा घेतानाच प्रादेशिक व जागतिक मुद्यांवर चर्चा केली. आसियानचे पुढील अध्यक्षपद मिळाल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी सिंगापूरचे अभिनंदन केले आणि या जबाबदारीत भारत सिंगापूरला पूर्ण पाठिंबा देईल असे सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat