अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर : पंतप्रधानांसमवेत चर्चा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहारमंत्री मार्को रुबियो यांनी शनिवारी सेवा तीर्थ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान, त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावतीने पंतप्रधान मोदींना अमेरिका भेटीचे निमंत्रण दिले. माध्यमांच्या वृत्तानुसार, मोदी आणि रुबियो यांच्यातील बैठक एका तासाहून अधिक काळ चालली. यावेळी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हेही उपस्थित होते. सुरक्षा, व्यापार आणि महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये अमेरिका आणि भारत यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर चर्चेत भर देण्यात आला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या चीन भेटीनंतर अवघ्या सात दिवसांनी रुबियो भारत दौऱ्यावर दाखल झाले आहेत. अमेरिकी माध्यमांच्या मते, ही केवळ एक राजनैतिक मोहीम नसून परिस्थिती नियंत्रणात आणण्याची मोहीम आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांच्या अलीकडील चीन भेटीमुळे आशियाई राजकारणात नवीन तणाव निर्माण झाला आहे. बीजिंगमध्ये ट्रम्प यांनी चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांची उघडपणे प्रशंसा करत त्यांना एक महान नेते व विशेष मित्र म्हटले होते. याचदरम्यान, आता जागतिक ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो शनिवारी भारतात दाखल झाले.
अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांचा चार दिवसांचा भारत दौरा शनिवारपासून सुरू झाला. पदभार स्वीकारल्यापासूनचा हा त्यांचा पहिला भारत दौरा आहे. अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी शुक्रवारी संध्याकाळी रुबियो स्वीडनहून भारतासाठी रवाना झाल्याची माहिती जारी केली होती. भारतात येण्यापूर्वी परराष्ट सचिव रुबियो स्वीडनच्या दौऱ्यावर होते.
कोलकात्यापासून दौऱ्याला प्रारंभ
परराष्ट्र मंत्रालयाने रुबियो यांच्या चार दिवसीय भारत दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले होते. या वेळापत्रकानुसार, मार्को रुबियो शनिवार, 23 मे रोजी सकाळी 7:00 वाजता कोलकाता येथे पोहोचले. कोलकाता येथे त्यांनी काही स्थानिक कार्यक्रमांमध्ये उपस्थिती दर्शविली. त्यानंतर ते दुपारी 1:15 वाजता दिल्लीत दाखल झाले. दिल्लीत दुपारी 2:00 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचले. आता 24 मे रोजी सकाळी 11:30 वाजता दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्यासोबत त्यांची द्विपक्षीय बैठक होईल. यानंतर रुबियो सायंकाळी 6:20 वाजता अमेरिकी दूतावासात एका सोहळ्याला उपस्थित राहतील. 25 मे रोजी ते सकाळी 9:00 वाजता आग्रा येथील एका कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर ते दुपारी 1:00 वाजता जयपूर येथील एका कार्यक्रमाला उपस्थित राहतील. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी, 26 मे रोजी ते सकाळी 6:50 वाजता पुन्हा नवी दिल्लीत दाखल होतील. सकाळी 8:30 वाजता दिल्लीत एका कौटुंबिक फोटोसेशनमध्ये सहभागी होतील.
26 मे रोजी क्वाड बैठकीला उपस्थिती
रुबियो 26 मे रोजी सकाळी 9:00 वाजता हैदराबाद हाऊस येथे क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत एका बैठकीला उपस्थित राहतील. बैठकीनंतर, सकाळी 9:50 वाजता एक प्रसिद्धीपत्रक जारी केले जाईल. यानंतर, मार्को रुबियो सकाळी 11:00 वाजता अमेरिकेकडे रवाना होतील. अमेरिकन परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांचा भारत दौरा क्वाड भागीदारीसाठी महत्त्वाचा आहे. क्वाड देशांची ही बैठक एका खुल्या आणि मुक्त इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण आहे. या बैठकीत प्रादेशिक सुरक्षा आणि महत्त्वपूर्ण खनिजांच्या पुरवठा साखळीच्या विविधीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे.
क्वाड बैठकीत प्रमुख मुद्द्यांवर चर्चा
क्वाड देशांमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका यांचा समावेश आहे. परस्पर सहकार्य, एक मुक्त, खुला, सर्वसमावेशक आणि समृद्ध इंडो-पॅसिफिक प्रदेश सुनिश्चित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. 26 मे रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन भारत करत आहे. परराष्ट्रमंत्र्यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्यासोबतच ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनी वोंग आणि जपानचे परराष्ट्रमंत्री तोशिमित्सू मोटेगी या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी भारताला भेट देतील.

