उमरग्यात हनुमान जयंतीनिमित्त काळ्या मारुतीला दर्शनासाठी भाविकांची गर्दी
अंत्रोळी - अंत्रोळी (ता. द. सोलापूर) : अंत्रोळी येथील ग्रामदैवत स्वयंभू चहुमुखी हनुमान मंदिरात चैत्र पौर्णिमेनिमित्त हनुमान जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला.
पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित कीर्तनात हनुमानाच्या जन्मकथेचे भावपूर्ण वर्णन करण्यात आले. सूर्योदयाच्या शुभमुहूर्तावर हनुमान जन्म सोहळा पार पडताच मंदिरात पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी हनुमानाच्या मूर्तीला विधीवत अभिषेक करून पूजन करण्यात आले. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दि. ३ एप्रिल रोजी अंत्रोळी येथे दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, पंचक्रोशीतील हजारो भाविक या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. दिवसभर भारूडाचा कार्यक्रमही होणार आहे. मंदिर परिसर तसेच पालखी मार्ग फुलांच्या आकर्षक सजावटीने नटविण्यात येणार आहे. हनुमानाची पालखी पुजाऱ्यांच्या घरी नेऊन दिंडी व वारकऱ्यांच्या समवेत मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर मंदिरासमोर दहीहंडी फोडून उत्सवाचे मुख्य आकर्षण साजरे करण्यात येणार आहे. यावेळी पुष्पवृष्टी तसेच नवसाचे नारळ फोडण्याचा कार्यक्रमही पार पडणार आहे. दि. ४ एप्रिल रोजी भव्य जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले असून पंचक्रोशीतील कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या धार्मिक सोहळ्यास पंचकमिटीच्या वतीने पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

