खानापुरातील दलित संघर्ष समितीची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : खानापुरातील केएसआरपी परिसरालगत असलेल्या सर्व्हे क्रमांक 30, 38, 40 आणि 45 या शेतजमिनीबाबत सुरू असलेल्या वादाला नवे वळण लागले आहे.
या ठिकाणी लावण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या फलकामुळे स्थानिक पातळीवर तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्मयातील दलित नेत्यांनी खानापूर पोलीस निरीक्षकांकडे निवेदन देत वादग्रस्त ठिकाणी लावलेला फलक तात्काळ हटवून शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्याची मागणी केली आहे. याप्रकरणात जिल्हा प्रशासनाने हस्तक्षेप करून वातावरण निवळण्याची मागणी दलित संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आली.
याबाबतचे निवेदन दलित संघर्ष समितीतर्फे देण्यात आले. निवेदनात, हुबळी येथील रविकुमार नावाच्या व्यक्तीने संबंधित वादग्रस्त जमिनीत बेकायदेशीररित्या प्रवेश करून तेथे वास्तव्य केले आहे. तसेच त्याने त्याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा फलक विनापरवानगी लावला आहे. यामुळे दोन समाजांमध्ये गैरसमज निर्माण होऊन वातावरण बिघडण्याची भीती व्यक्त आहे. संबंधित व्यक्ती अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातील असल्याने कायद्याचा गैरवापर होऊ शकतो, अशी भीतीही काही नागरिकांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर स्थानिकांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले.
संबंधित फलक हटवून तणाव कमी करा
या घटनेनंतर स्थानिक दलित नेत्यांनीही पुढाकार घेत 20 मार्च 2026 रोजी स्वतंत्र पत्रकार परिषद आयोजित केली. नेत्यांनी या प्रकरणाचा निषेध करत बाहेरच्या व्यक्तीकडून वादग्रस्त ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचा वापर करणे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले. या जमिनीबाबत खानापूर येथील कावळे मठ आणि द पायनियर कंपनी यांच्यात दिवाणी वाद सुरू आहे. या वादात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा गैरवापर होत असून दोन समाजात तणाव वाढत चालला आहे. यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून संबंधित फलक हटवावा. तसेच दोन्ही गटांमधील तणाव कमी करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी केली.

