दोन माणसांमध्ये जीवश्च-कंठश्च मैत्री असणे अगदी स्वाभाविक आहे. तथापि, सध्या उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील एक वकील आणि न्यायालयाच्या आवारातील एक वानर यांची दाट मैत्री, हा चर्चेचा विषय बनला आहे.
गेल्या 5 वर्षांपासून या दोघांची घनिष्ट मैत्री आहे. इतकी, की हा वानर नेहमी त्या वकीलासह दिसतो. त्याच्या कार्यालयात जाऊन बसतो. त्याच्याशी खेळतो आणि त्याच्याकडून खाण्याचे पदार्थही अगदी अधिकार असल्यासारखे घेतो. या वकीलाचे नाव महेश यादव असे आहे. ही मैत्री नेमकी अशी झाली, हे गूढ आहे. मात्र, दोघांनाही एकमेकांशिवाय करमत नाही, असे दिसून येते. महेश यादव त्याच्यासाठी प्रत्येक दिवशी खाण्यासाठी रोटी घेऊन येतात. या वानराला या खाण्याची इतकी सवय झाली आहे, की यादव यांच्या कोटाचे खिसे धुंडाळून हा वानर रोटी शोधतो.
यादव न्यायालयाच्या आवारातील आपल्या कार्यालयात येऊन बसले की, हा वानर त्यांच्यासमोरच्या टेबलवर ठाण मांडून बसतो. यादवही त्याच्यावर तितकीच माया करतात. ते त्याला भगवान हनुमानाचे प्रतीक समजून नमस्कारही करतात. तसेच त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करतात. यादव या वानरालासाठी प्रत्येक दिवशी एकतरी रोटी आपल्या घरातून घेऊन येतात. रोटी मिळाली की हा वानर कार्यालयातून जातो. यादव त्याच्या डोक्यावरुन मायेने हात फिरवतात. ते या वानराला खूपच आवडते, असे दिसून येते. कित्येकदा वकील साहेब वानराला स्वत:च्या हाताने रोटी भरवतात. महेश यादव गेली 30 वर्षे गाझियाबाद जिल्हा न्यायालयात वकीली करतात. ते काही कारणामुळे कार्यालयात आले नाहीत, तर हा वानर त्यांच्या कार्यालयाभोवती घुटमळतो. त्यांना शोधण्याचा प्रयत्न करतो. नंतर ते ज्यावेळी कार्यालयात येतात, तेव्हा पुन्हा त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्याकडून रोटी घेतो. एक वकील आणि एक वानर यांची ही विलक्षण मैत्री गाझियाबाद जिल्हा न्यायायलाच्या आवारातच नव्हे, तर आसपासच्या प्रदेशातही एक चर्चेचा विषय बनली आहे. महेश यादव यांच्या पक्षकारांनाही आपला वकील आणि हा वानर यांच्या मैत्रीचे कौतुक वाटते. कित्येक जण या दोघांसह सेल्फीही काढून घेतात. एक नर आणि एक वानर यांची ही मैत्री अशाप्रकारे खूपच प्रसिद्ध झालेली आहे.

