Dailyhunt
विधानसभांचे रण 'कोण जिंकणार?'

विधानसभांचे रण 'कोण जिंकणार?'

श्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरीमध्ये आज मतमोजणी : निकालाकडे देशाचे लक्ष

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि केरळ ही चार राज्ये आणि पुद्दुचेरी हा केंद्रशासित प्रदेशमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सोमवार, 4 मे रोजी होत आहे.

या राज्यांमध्ये 'कोणाची सत्ता येणार?' याची उत्सुकता संपूर्ण देशाला लागून राहिलेली आहे. या निवडणुकीत पश्चिम बंगालसह सर्वच ठिकाणी मतदानाचा टक्का वाढल्याने निकालाबाबत वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. मात्र, आज सोमवारी होणाऱ्या मतमोजणीअंती कोणता पक्ष विधानसभेचे रण गाजवतो हे स्पष्ट होणार आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार असून दहा वाजेपर्यंत प्राथमिक कल आणि 12 वाजेपर्यंत बहुतांश चित्र स्पष्ट होईल. मात्र, संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होऊन पक्षनिहाय संख्याबळ समजण्यासाठी सायंकाळपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

आसाम विधानसभेच्या 126 जागा, केरळ विधानसभेच्या 140 जागा आणि पुद्दुचेरी विधानसभेच्या 30 जागांसाठी 9 एप्रिल रोजी मतदान झाले. तामिळनाडूच्या 234 जागांसाठी 23 एप्रिल रोजी मतदान झाले. पश्चिम बंगाल विधानसभेच्या 294 जागांसाठी 23 आणि 29 एप्रिल 2026 रोजी दोन टप्प्यांत निवडणुका पार पडल्या. आता या सर्व राज्यांमध्ये मतमोजणी 4 मे, 2026 रोजी होणार आहे. सर्वांचे लक्ष मतमोजणी आणि निवडणुकीच्या निकालांवर लागले आहे. मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू होईल. प्रथम पोस्टल मतपत्रिकांची मोजणी केली जाईल, त्यानंतर ईव्हीएम मतांची मोजणी होईल.

पश्चिम बंगाल राज्यातील द्वितीय आणि अंतिम टप्प्याचे मतदान पूर्ण होताच विविध सर्वेक्षण संस्थांनी त्यांचे मतदानोत्तर सर्वेक्षणाचे (एक्झिट पोल) निष्कर्ष घोषित केले आहेत. या एक्झिट पोलचा सर्वंकष विचार करता आसाम, पश्चिम बंगाल ही दोन राज्ये तसेच पुद्दुचेरी हा केंद्रशासित प्रदेश अशा तीन ठिकाणी भाजप आणि रालोआची सरशी होईल, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तसेच केरळ काँग्रेस आघाडीकडे जाईल, तर तामिळनाडू द्रमुककडेच राहील, असे भाकितही वर्तवण्यात आले आहे. केरळसंबंधी मात्र, सर्व सर्वेक्षणांमध्ये काँग्रेस आघाडीचीच सरशी होईल, असे भाकित वर्तविण्यात आले आहे. त्यामुळे 4 मे या दिवशी नेमके काय होणार, यासंबंधी सर्वांनाच उत्सुकता आहे.

प. बंगालमध्ये जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकांच्या या फेरीत पश्चिम बंगालमधील निकालांकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप म्हणजेच 'दीदी विरुद्ध मोदी' यांच्यातील राजकीय संघर्षामुळे येथील निवडणूक बरीच गाजली. येथे सलग पंधरा वर्षे तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे. राज्यातील एकूण जागांची संख्या 294 असून बहुमतासाठी 148 हा जादुई आकडा गाठावा लागेल. पश्चिम बंगालसंबंधी अनेक सर्वेक्षणे प्रसिद्ध झाली आहेत. मात्र, यंदा 'सत्ता परिवर्तन' होणार असल्याचा निष्कर्ष बहुतेक सर्व सर्वेक्षण संस्थांनी काढला असला तरी दोघांनी बहुमतासाठी आवश्यक असलेला 'जादुई आकडा' न गाठल्यास सत्तेसाठी रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यातील फाल्टा मतदारसंघात सर्व 285 मतदान केंद्रांवर 21 मे रोजी फेरमतदान होणार असून 24 मे रोजी मतमोजणी होईल. तूर्तास 293 जागांचीच मतमोजणी पार पडेल.

आसाममध्ये पुन्हा कमळ फुलणार?

आसाममध्ये पुन्हा भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्रपक्ष यांनाच मोठे बहुमत मिळेल, असा निष्कर्ष एक्झिट पोलमध्ये काढण्यात आला आहे. तो खरा ठरल्यास भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्रपक्ष हे या राज्यात विजयाची हॅट्ट्रिक साध्य करू शकतात. आसाममध्ये विधानसभेच्या एकूण 126 जागा असून स्पष्ट बहुमतासाठी 64 जागा मिळवाव्या लागतील.

तामिळनाडूत सत्तापालट?

234 जागा असलेल्या तामिळनाडूनेही ह्या निवडणुकीत रंगत आणली. एका संस्थेचा अपवाद वगळता इतर संस्थानी अण्णाद्रमुकच्या नेतृत्वातील रालोआ विजयी होईल, असे अनुमान काढण्यात आले असून द्रमुक पक्षाला सत्ता सोडावी लागेल, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. दोन अपवाद वगळता तामिळनाडूत सध्याचे द्रमुक सरकार पुन्हा सत्तेवर येईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. एका सर्वेक्षण संस्थेने मात्र अभिनेता विजय याचा टीव्हीके हा पक्ष सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष म्हणून समोर येईल आणि विधानसभा त्रिशंकू असेल, असे भाकित केले आहे. त्यामुळे उत्कंठा वाढली आहे. चार संस्थांनी द्रमुक आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, असा निष्कर्ष काढला असून दोन संस्थांनी या राज्यातील सत्तांतर होऊन अण्णाद्रमुकच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सत्तेवर येईल, असा निष्कर्ष काढल्याचे दिसत आहे.

विविध राज्यांचे संख्याबळ

राज्य एकूण जागा बहुमताचा आकडा

पश्चिम बंगाल 294 148

तामिळनाडू 234 118

केरळ 140 71

आसाम 126 64

पुद्दुचेरी 30 16

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat