Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
विद्यार्थ्यांच्या भावना समजून घ्या

विद्यार्थ्यांच्या भावना समजून घ्या

सरसंघचालक मोहन भागवत यांची सूचना

► वृत्तसंस्था

नवी दिल्ली

विद्यार्थी आणि युवक ही शक्ती आहे. त्यामुळे त्यांच्या भावना समजून घेण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांचे ऐकले पाहिजे. त्यांना केवळ आदेश देऊन भागणार नाही.

देशाकार्यात त्यांना सकारात्मकरित्या सहभागी करुन घेण्याची आवश्यकता आहे, असे महत्वपूर्ण प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. युवकांशी चर्चा करणे आवश्यक आहे. त्यांना केवळ आदेश देऊन किंवा सूचना देऊन काम भागणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आजचा युवक केवळ आदेश मानणार नाही. त्याला कोणाची हुकुमशाही नको आहे. त्याच्याशी चर्चा करुन त्याला समजून घेण्याची आवश्यकता आहे. युवकांविषयीचे निर्णय त्यांच्याशी संवाद साधून घेतले जावेत. त्यांना विश्वासात घेतले जावे. तसेच सातत्याने त्यांच्या संपर्कात राहण्याचे भान राजकारण्यांनी ठेवावयास हवे. सध्याच्या काळात युवकवर्गाची भावना आणि महत्वाकांक्षा यांना महत्व देऊन त्यांची जोपासना करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. युवक आणि विद्यार्थी हे त्यांच्यासमोर जो आदर्श ठेवला जातो, त्यावरुन शिकतात. केवळ शब्दांवरुन ते शिकत नाहीत. विद्यार्थ्यांना आणि युवकांना योग्य दिशा देण्यासाठी त्यांचा त्यांच्या पालकांशी संवाद होण्याची अत्यंत आवश्यकता आहे. पालकांनीही आपल्या मुलांना विश्वासात घेऊन चांगले आणि वाईट यांच्यातील अंतर समजून दिले पाहिजे. अन्यथा मुले भरकटण्यास वेळ लागत नाही. सध्याच्या काळात मुले आणि विद्यार्थी हे निरीक्षणातून अधिक समजून घेतात. केवळ शाब्दिक सल्ले त्यांना नको असतात. पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली पाहिजेत. त्यांचा चौकसपणा जोपासला पाहिजे. पालकांनी आपल्या कामांमधून जास्तीत जास्त वेळ काढून तो आपल्या मुलांना दिला पाहिजे. तरच मुलांवर योग्य प्रकारचे संस्कार होण्याची शक्यता असते. स्वत: पालकांनी त्यासाठी स्वत:ची वर्तणूक सुधारण्याची नितांत आवश्यकता आहे. त्याशिवाय, मुलांवर आणि विद्यार्थ्यांवर सुसंस्कार होणार नाहीत. त्यांना भावनिक आधाराची आवश्यकता आहे, अशी मांडणी त्यांनी केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat