राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो आणि कोणी कोणाचा शत्रूही नसतो, हेच वारंवार सिद्ध होत आहे. तामिळनाडूमध्ये आज विजय जोसेफ यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होत आहे. तामिळनाडू विधानसभेमध्ये कोणत्याही पक्षाला जनतेने स्पष्ट बहुमत दिलेले नाही.
गेली 50 वर्षे या राज्यामध्ये अण्णाद्रमुक किंवा द्रमुक या दोन्हीच पक्षांकडे आलटून पालटून सत्ता जात होती. यंदा प्रथमच विजय जोसेफ या अभिनेत्याने चित्रपट क्षेत्रातील लोकप्रियतेचा लाभ उठवून जनतेला भरघोस आश्वासने देऊन निवडणुकीत 'टीव्हीके' नावाचा पक्ष स्थापन करून प्रत्यक्ष आपली फौज तयार केली. तामिळनाडूचे मतदार हे जास्तीत जास्तपणे चित्रपट अभिनेता किंवा चित्रपट अभिनेत्रीला देव मानतात. त्यांच्या बाजूने वलय निर्माण करतात आणि निवडणुकीत त्यांना विजयी करतात.
तामिळनाडूतील सत्ता ही नेहमीच द्रविडीयनकडेच राहते. प्रथमच या परंपरेला छेद देत एक वेगळा चमत्कार तामिळनाडूमध्ये विजय जोसेफ यांनी केला आहे. दर पाच वर्षानंतर तामिळनाडूमध्ये सत्ता बदल होत असतो. जो लोकप्रिय नेता असतो तो पाचव्या वर्षी अप्रिय ठरतो आणि जो विरोधी पक्षात असतो तो लोकनेता बनतो व लोकप्रिय बनतो.
अशाप्रकारे आलटून पालटून अण्णाद्रमुक व द्रविड मुन्नेत्र कझगम या दोनच पक्षांची सरकारे दर पाच वर्षांनी येत होती. यंदा प्रथमच तामिळनाडूतील एक युवा अभिनेता राजकारणात प्रवेश करतो काय आणि पहिल्याच निवडणुकीमध्ये आपले अनेक कार्यकर्ते उभे करतो व तब्बल 108 जागांवर आपले उमेदवार निवडून आणतो. तामिळनाडूच्या राजकीय इतिहासामध्ये हा एक नवा विक्रम प्रस्थापित करण्यात विजय जोसेफ या युवकाला यश मिळाले आहे. तामिळनाडूच्या 234 जागांपैकी स्पष्ट बहुमतासाठी 118 आमदारांचे संख्याबळ आवश्यक आहे.
विजय जोसेफ तथा थलपती विजय यांना 108 आमदारांचे पाठबळ मिळाले आहे. अखिल भारतीय अण्णाद्रमुक पक्षाला 52 जागा आणि द्रमुक पक्षाला 74 जागा प्राप्त झाल्या. द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन्ही पक्षांनी छोट्या छोट्या राजकीय पक्षांबरोबर आघाडी केली होती. आता विजय जोसेफ यांना बहुमतासाठी दहा आमदार कमी पडत आहेत.
काँग्रेस पक्ष आपल्या पाच आमदारांसह विजय जोसेफ यांच्या मदतीसाठी आला आहे. सध्या सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेसला तामिळनाडूमध्ये सत्तेत सहभागी होण्यास फार आनंद वाटतोय. हे करताना सत्तेसाठी या पक्षाच्या नेत्यांनी गेली 50 वर्षे द्रमुक पक्षाबरोबर असलेली आपली पारंपरिक आघाडी देखील तोडून टाकली आहे. अण्णाद्रमुक पक्षाबरोबर देखील जे लहान पक्ष होते त्यातील एका पक्षाने विजय जोसेफ यांना आपला पाठिंबा जाहीर केला.
या पार्श्वभूमीवर विजय जोसेफ यांनी तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन सरकार स्थापनेसाठी दावा केला. आता विजय जोसेफ यांच्या टीव्हीके या सत्ता पक्षाकडे बहुमतासाठी आवश्यक तेवढेच बहुमत म्हणजे 'पेपर थीन' बहुमत जमा झाले आहे. वास्तविक स्पष्ट बहुमत नसल्याने विजय जोसेफ यांनी अखिल भारतीय अण्णा द्रमुक पक्ष यांच्याबरोबर आघाडी करण्यास हरकत नव्हती. राजकारण म्हणजे नेमके काय हे आता नाही, तर आणखी सहा महिन्यानंतर त्यांना कळू लागेल.
तामिळनाडूच्या राजकारणात अनेक चित्रपट कलावंत आले आणि गेले. चित्रपटातील लोकप्रियता ही पडद्यावरची लोकप्रियता असते, राजकारणात ही लोकप्रियता मिळतेच असे नाही. विजय जोसेफ हे आज सकाळी दहा वाजता चेन्नईमध्ये शपथ ग्रहण करतील. युवा वर्गासाठी 'आयकॉन' ठरलेले विजय जोसेफ हे सध्या तरी लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत.
एकदा शिखर व शिखराचे टोक गाठल्यानंतर त्यापुढे काही नसते, नंतर केवळ घसरणच असते किंवा उतरती लागते. चित्रपटातील लोकप्रियता प्रत्यक्षात राजकारणात सध्या जरी उपयोगी ठरली तरी देखील स्पष्ट बहुमत नसल्याने, त्यातच काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाबरोबर केलेली युती खरोखरच कितपत परवडणार! हे देखील पहावे लागेल. तामिळनाडूच्या राजकारणात स्टॅलिन गेले आणि जोसेफ आले, एवढाच फरक पडणार असे भाकीत अनेकजण व्यक्त करतात.
म्हणजे जुन्या बाटलीत नवी दारू असा प्रकार ठरू नये. जिंकून येण्यासाठी राजकीय नेते आणि आता चित्रपट अभिनेते देखील प्रचंड आश्वासने जनतेला देतात आणि नंतर सरकारचे कोषागार कसे भरायचे, याची विवंचना राहते. विजय जोसेफ यांनी जनतेला प्रचंड आश्वासने दिलेली आहेत. या आश्वासनांची पूर्तता करण्यामध्ये प्रचंड शक्ती खर्च करावी लागेलच शिवाय राजकीय पक्षांमध्ये फूट पाडून त्यातील आमदार आपल्याबरोबर आणून स्वत:चा पक्ष मजबूत करायचा आणि नंतर मग काँग्रेसला बाहेरचा मार्ग दाखवायचा हा प्रकार देखील करावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

